बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेने दीर्घकाळ सेवेत असलेल्या पौरकार्मिकांना घरे द्यावी त्या मागणीसह विविध 17 मागण्यांसाठी सफाई कर्मचारी कावलू समिती -कर्नाटक या संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सुवर्ण विधानसौध समोर धरणे सत्याग्रह करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर करण्यात आले.
सफाई कर्मचारी कावलू समिती -कर्नाटक बेळगाव जिल्हा समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात महापालिकेचे बहुसंख्य पौरकार्मिक सहभागी झाले होते.
आपल्या मागण्यांसंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना माजी नगरसेवक वाघेला म्हणाले की, गेल्या 40 वर्षापासून काम करणाऱ्या पौरकार्मिकांना सरकारने अद्यापपर्यंत घरे दिलेली नाहीत. या उलट हुबळी, धारवाड, बेंगलोर, विजापूर, गदग वगैरे सर्व ठिकाणी महापालिकांमध्ये जे कर्मचारी सफाईचे काम करतात त्यांना घरे देण्यात आलेली आहेत.
तथापि बेळगाव महापालिकेकडून मात्र सफाई कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत घरे वितरित करण्यात आलेली नाहीत, ती घरे संबंधित कामगारांना तात्काळ मिळावी ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी म्हणजे पौरकारमिकांच्या ज्या 396 कुटुंबांना ओळखण्यात आले असले तरी त्यांना अद्याप ओळखपत्रे देण्यात आलेली नाहीत. ती त्यांना लवकरात लवकर मिळावीत. त्याप्रमाणे महापालिकेने अलीकडेच 134 कामगारांना सेवेत कायम केले असले तरी अद्याप त्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात आलेला नाही.
महत्त्वाची मागणी म्हणजे बेळगाव महापालिकेमध्ये जे सफाई कामगार काम करतात, त्यांच्या व्यतिरिक्त बस स्थानकं रेल्वे स्थानक, हॉटेल्स, चित्रपटगृहं वगैरे ठिकाणी काम करणाऱ्या पौरकारमिकांना स्वतःची घरे नाहीत. अशा सफाई कामगारांना राजीव गांधी आवास योजनेअंतर्गत घरे द्यावीत असा सरकारचा आदेश आहे. त्याचीही अंमलबजावणी बेळगाव महापालिका करावयास तयार नसून ती तात्काळ केली जावी.
या पद्धतीच्या आमच्या एकूण 17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही आज येथे सफाई कर्मचारी कावलू समिती अर्थात बेळगाव सफाई कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन सुरू केले असून आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर करणार आहोत आणि त्यांनी आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमची विनंती आहे, असे माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी शेवटी सांगितले.




