बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील नाट्यरसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘कॅपिटल वन मल्टिपर्पज सोसायटी’ आयोजित ‘कॅपिटल वन करंडक’ एकांकिका नाट्यस्पर्धेचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या नाट्यमहोत्सवामुळे बेळगावकरांना दर्जेदार कलाकृतींची मेजवानी मिळणार असून, आज या स्पर्धेच्या फिरत्या ढाल आणि ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव हंडे यांनी स्पर्धेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. “एकेकाळी या स्पर्धेसाठी कोकणातून संघ बोलवावे लागायचे, मात्र आज सहभागी १८ पैकी ८ संघ हे बेळगावचे आहेत, हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे. बेळगावची खंडित झालेली नाट्यपरंपरा पुन्हा उर्जितावस्थेला आणण्यासाठी आणि हा नाट्यप्रपंच अखंड सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, यंदाचे एकांकिका स्पर्धेचे १४ वे वर्ष आहे” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
ज्येष्ठ रंगकर्मी वामन मधुसूदन पंडित यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “बेळगावसारख्या सीमाभागात मराठी भाषेचा आणि कलेचा समृद्ध वारसा जपण्याचे काम ‘कॅपिटल वन’ने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तेवढ्याच चैतन्याने केले आहे. केवळ स्पर्धा न भरवता त्यात सातत्य आणि दर्जा राखणे ही मोठी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यंदाच्या स्पर्धेसाठी प्रमोद काळे (पुणे), सुनील खानोलकर (मुंबई) आणि वामन मधुसूदन पंडित (सिंधुदुर्ग) हे अनुभवी परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध भागांतून आलेले संघ आपली कला सादर करणार असून, बेळगावच्या नाट्य चळवळीला या स्पर्धेमुळे नवी उभारी मिळाली आहे.

सलग १४ व्या वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धेदरम्यान करंडकाचे अनावरण अमाप उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री प्रमोद काळे, वामन पंडीत, व सुनील खानोलक यांच्या बरोबर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्हा. चेअरमन शाम सुतार उपस्थित होते..प्रारंभी चेअरमन हंडे यांनी १३ वर्षाच्या कालखंडाचे थोडक्यात विवेचन करून आजवर मान्यवर परीक्षक चोखंदर नाट्य रसिक व नाट्यकर्मींच्या सहकार्यामुळेच स्पर्धेमध्ये सातत्य राखण्यात आले असे नमूद केले.
यावेळी बोलताना वामन पंडीत यांनी नाट्य रसिकांकडून मिळणाऱ्या भरघोस पाठिंबा व संस्थेने कष्टाने उभ्या केलेल्या या स्पर्धांचे स्वागत व प्रशंसा केली . यावेळी संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर,संजय चौगुले,शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव, सदानंद पाटील ,सुभाष सुंणठणकर निळूभाऊ नार्वेकर.. व कर्मचारी वर्ग पिग्मी कलेक्टर उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धे मध्ये १८ स्पर्धक संघानी सहभाग दर्शविला असून आज या पैकी ९ संघानी सादरीकरण केले आहे. शेवटच्या एकांकिका नंतर मान्यवरांचा हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.


