बेळगाव लाईव्ह :राजकारण, पद, सत्ता या साऱ्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा माणुसकी बोलते, तेव्हा एखादी व्यक्ती देवदूत बनते. गोवा ते नवी दिल्ली या विमानप्रवासात घडलेला प्रसंग याचाच जिवंत दाखला ठरला आहे.
खानापूरच्या माजी आमदार, काँग्रेस नेत्या आणि पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी एका अमेरिकन युवतीचा प्राण वाचवत प्रत्यक्षात देवदूताची भूमिका निभावली.
विमान उड्डाणानंतर काही वेळातच त्या अमेरिकन युवतीला अचानक थंडी वाजणे, श्वासोच्छवासात अडथळा आणि बेशुद्धावस्था जाणवू लागली. काही क्षणांतच तिची नाडीही थांबली. विमानातील वातावरण एकदम तणावपूर्ण झाले. अशा गंभीर क्षणी डॉ. अंजली निंबाळकर धावून पुढे आल्या.
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कार्डिओ-पल्मनरी रिससिटेशन (CPR) सुरू केले. बंद पडलेले हृदय पुन्हा धडधडू लागले आणि युवतीला शुद्ध आली. मात्र अर्ध्या तासानंतर ती युवती पुन्हा कोसळली. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या क्षणीही अंजलीताई खंबीर राहिल्या. पुन्हा एकदा योग्य वैद्यकीय उपचार देत त्यांनी त्या युवतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले.

हा केवळ वैद्यकीय हस्तक्षेप नव्हता, तर माणुसकीचा विजय होता. राजकीय ओळख बाजूला ठेवून एका डॉक्टरने आपले कर्तव्य निभावत एका अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचवले. त्या अमेरिकन युवतीसाठी अंजलीताई डॉक्टर नव्हत्या, तर देवदूत ठरल्या.
विमानातील प्रवासी, कर्मचारी आणि नंतर सोशल मीडियावरून या घटनेची माहिती समोर येताच अंजली निंबाळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “नेतृत्व म्हणजे केवळ व्यासपीठावरचे भाषण नाही, तर संकटाच्या क्षणी पुढे सरसावून उभे राहणे होय,” हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
आज अनेकांसाठी डॉ. अंजली निंबाळकर या खानापूरच्या माजी आमदार असतील, काँग्रेस नेत्या असतील; पण त्या अमेरिकन युवतीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी त्या आयुष्यभर देवदूत म्हणूनच ओळखल्या जातील.


