बेळगाव लाईव्ह : “कर्नाटक सरकारमध्ये खुर्चीसाठी युद्ध सुरू झाले आहे. सत्तासंघर्षामुळे जनतेचे प्रश्न बाजूला पडले आहेत,” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली. ते आज बेळगाव विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.विजयेंद्र म्हणाले, “सध्याच्या सरकारमध्ये सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. सर्वांचे लक्ष बिहार निवडणुकीकडे लागले आहे, परंतु ती संपल्यावर या सत्तासंघर्षाचे खरे रूप सर्वांना दिसेल. सरकारमध्ये स्थैर्य उरलेले नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी बेळगावात आलो आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, ही आमची मागणी आहे. कोणाकडे कोणते साखर कारखाने आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कारखानदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून या प्रश्नावर तोडगा काढावा.”
मूडलगी तालुक्यातील गुरलापुर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली. “सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्ही मैदानात उतरणार आहोत,” असा इशारा विजयेंद्र यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये अधिवेशनाच्या काळात शेतकरी विठ्ठल अरबावी यांनी ऊस दराच्या प्रश्नावर आत्महत्या केली होती. त्या वेळी येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून न्याय मिळवून दिला. आज पुन्हा तशीच वेळ आली आहे.”
विजयेंद्र म्हणाले, “राज्यात दरवर्षी सुमारे ६ दशलक्ष टन ऊसाचे उत्पादन होते आणि सरकारला त्यातून ५० ते ६० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या दु:खाकडे डोळेझाक करत आहे. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत न करणे हे सरकारचे अपयश आहे.”


