बेळगाव लाईव्ह : ऊस उत्पादकांच्या प्रतिटन ३,५०० रुपये दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांस पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेतकऱ्यांशी सातत्याने चर्चा करत असून, गरज भासल्यास आपण स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊ, असे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
बेळगाव येथे मंगळवारी (आज) प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले की, ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांस पूर्ण अधिकार दिले आहेत. “ते शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
आंदोलक शेतकरी ‘पालकमंत्र्यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट द्यावी’ अशी मागणी करत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. “आमच्या वतीने आणि कारखान्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दोन-तीन वेळा भेट घेतली आहे. तरीही आवश्यकता वाटल्यास मी स्वतः सुद्धा भेट देईन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एच.वाय. मेटी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मेटी यांच्या निधनामुळे पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले असून, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.


