बेळगाव लाईव्ह- “उद्योगपती बाळासाहेब पाटील यांचे कार्य केवळ एका जातीपुरता मर्यादित नव्हते. जात, भाषा, धर्म याची बंधन बाजूला ठेवून बाळासाहेबांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला सढळ हस्ते मदत केली. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास निर्माण केला. हा इतिहास तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावा असाच आहे” असे विचार माजी आमदार संजय पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
महावीर भवन येथे मंगळवारी उद्योगपती बाळासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेप्रसंगी ते बोलत होते.जैन समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक गोपाल जनगौडा हे होते. व्यासपीठावर जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेबांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
विनोद दोड्डनावर : बाळासाहेब हे मोठ्या मनाचे उद्योगपती होते त्यांनी उत्तरांचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश सारख्या भागात बोगदा खोदायचे मोठे काम केले. भरतेश शिक्षण संस्थेच्या अडीअडचणीत ते नेहमी मार्गदर्शन करायचे. ते द्रष्टा नेता होते. त्यांची मुले त्यांचा वारसा असाच पुढे नेतील असा मला विश्वास वाटतो” असे विचार भरतेश शिक्षण संस्थेचे विनोद दोड्डनावर यांनी व्यक्त केला.
“बाळासाहेब पाटील यांच्या निधनाने फक्त जैन समाजाचेच नव्हे तर सर्व समाजांचे नुकसान झाले आहे. ते अनेक संस्थांचे आधारस्तंभ होते” असे हर्षवर्धन इन्सल अध्यक्ष जितो म्हणाले. “जैन समाजाने बाळासाहेबांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करावा”असे सुंदराबाई पाटील बीएड कॉलेजचे विक्रम लेंगडे म्हणाले
“बुद्धिवंत, धनवंत, दानवंत बाळासाहेब” अशा शब्दात प्रमोद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“धर्मनाथ भवनाच्या उभारणीत मोठे योगदान देणाऱ्या बाळासाहेबांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले” असे माणिक बाग दिगंबर जैन बोर्डिंग चे पुष्पक हनमन्नावर म्हणाले
“ठळकवाडी हायस्कूल मधील शंभर विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी बी टी पाटील ग्रुप तर्फे गणवेश देण्याची सुरुवात बाळासाहेब पाटील यांनी केली” असे सी वाय पाटील सर यांनी सांगितले.
” बाळासाहेब यांच्याकडून सहकार्य घेतले नाही अशी एकही संस्था बेळगाव शहरात नाही . ते सर्व समावेशक व्यक्तिमत्व होते” असे विचार ऍड. रविराज पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
“बाळासाहेब पाटील म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. बी टी पाटील उद्योग समूहाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेबांनी देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी आपला हातभार लावला आहे.
त्याचबरोबर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सार्वजनिक वाचनालयाला मोठी देणगी दिली होती. ते बेळगावचे भूषण होते” असे विचार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी महावीर बँकेच्या वतीने श्रीपाल खेमलापुरे, जैन युवक मंडळाच्या वतीने राम कस्तुरी, श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने राजेंद्र जैन, श्रीमती निलांबरी वनकुद्रे यांचीही भाषणे झाली.
“कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेशु कदाचनम”असे कार्य करणारे बाळासाहेब हे मोठे व्यक्ती होते. अशा शब्दात गोपाल जिनगौडा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी बाळासाहेबांचे चिरंजीव सचिन व तुषार पाटील,तसेच बी टी पाटील उद्योग समूहातील कर्मचारी वर्ग आणि जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



