बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील जिल्हा विशेष जलदगती पॉक्सो न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका आरोपीला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. सवदत्ती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गंभीर गुन्ह्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
सौंदत्ती तालुक्यातील शिवप्पा भीमप्पा त्यापी (वय २६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर तत्कालीन अधिकारी एम.जी. मारीहाळ यांनी गुन्हा दाखल केला होता. तर तपास अधिकारी मंजुनाथ आय. नडविनमनी यांनी तपास करून दोषारोपपत्र बेळगाव येथील विशेष जलदगती पॉक्सो न्यायालयात सादर केले होते.
न्यायमूर्ती सी.एम. पुष्पलता यांनी या प्रकरणी साक्षीदार, पुरावे आणि जबाब नोंदवून आरोपीला ३० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाचा कारावास भोगावा लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला.
याचबरोबर, पीडित बालिकेस ४ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई जिल्हा विधी प्राधिकरणाकडून त्वरित मिळवून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. भविष्यात बालिकेच्या उपयोगासाठी ही भरपाईची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेशही न्यायालयाने दिला आहे.
या खटल्यामध्ये सरकारी विशेष अभियोक्ता एल.व्ही. पाटील यांनी यशस्वीरित्या बाजू मांडली आणि युक्तिवाद मांडला.



