बेळगाव लाईव्ह :खानापूर : जांबोटी–खानापूर मुख्य रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवम संजय कुंभार (वय 17, रा. नागुर्डावाडा, ता. खानापूर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक वाहनासह फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम हा जांबोटीहून खानापूरकडे पायी येत असताना नागुर्डावाडा हद्दीतील मोदेकोप क्रॉसजवळ वड्डिनावर यांच्या शेताजवळ वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे त्याला जोराची धडक दिली. या धडकेत शिवमच्या डोक्यासह उजव्या पाठीस गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिकांनी गंभीर अवस्थेत त्याला खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचारानंतर त्याला बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.45 वाजता त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून फरार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू असून, मृतदेहाचे उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर रात्री मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 243/2025 भादंवि कलम 134, 281, 187 तसेच मोटार वाहन कायदा कलम 125(9) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पीएसआय एम. बी. बिरादार पुढील तपास करीत आहेत.


