बेळगाव लाईव्ह :हलगा -मच्छे बायपास रस्त्याशी संबंधित वादग्रस्त जमिनींचे पुनरसर्वेक्षण केले जाईल. या रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या शेतात पाणी साचण्याच्या समस्येचे निवारण केले जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या रस्त्यासंदर्भातील खटल्यासाठी शेतकऱ्यांना हवी असलेली कागदपत्रे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध केली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. तसेच या तीन मुद्द्यांवर जिल्हा प्रशासन सध्या काम करणार असल्याचे सांगितले.
हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा आरोप करून हे काम तात्काळ थांबवावे, अशा मागणीचे निवेदन गेल्या शुक्रवारी शेतकऱ्यांच्यावतीने शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते. सदर निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी (डीसी) रोशन यांनी आज सोमवारी सकाळी हलगा -मच्छे बायपास रस्त्याला भेट देऊन त्याची पाहणी केली.
तत्पूर्वी शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांचे सकाळी आगमन झाले त्यावेळी बायपासच्या ठिकाणी शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर, राजू मरवे, प्रकाश नायक आदी नेत्यांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चारी बाजूने घेरून आपल्या तक्रारी मांडण्याबरोबर हा बायपास रस्ता रद्द करावा अशी मागणी केली. या रस्त्यामुळे आमच्या जीवनाची मोठी गुंतागुंत झाली आहे असे शेतकरी म्हणाले.
त्यावेळी शेतकऱ्यांची समजूत काढताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, जीवनात खरं तर कोणतीच गुंतागुंत नसते, आपण स्वतःच ती निर्माण करत असतो. तेंव्हा या रस्त्याच्या बाबतीत आपण सर्वांनी बसून विचार विनिमय करून उपाय शोधूया. एकदा का उपाय मिळाला की कोणतीच समस्या राहणार नाही. तेंव्हा हे करण्यासाठी प्रथम मला संधी तरी द्या. सदर बायपास रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर आणि अधिसूचना दाखवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
त्यांच्या त्या मागणीची मी स्वतः पूर्तता करेन. असे सांगून जिल्हाधिकारी रोशन यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी शेतकरी नेते राजू मरवे यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी हलगा -मच्छे बायपास रस्त्याला जोरदार विरोध करून हा रस्ता आम्हाला नको अशी मागणी केली. आमच्या सुपीक जमिनी उध्वस्त करणाऱ्या या बायपासचे रुंदीकरण करून आणखीन नुकसान केले जात आहे. त्यामुळे हा रस्ताच आम्हाला नको, असे मरवे यांनी स्पष्ट केले. त्यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी त्यांना शांत करताना तुमचे म्हणणे मी ऐकून घेतले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा प्रशासनाकडून जे काही शक्य होईल ते मी करणार आहे.
तेंव्हा त्यासाठी आवश्यक तीन मुद्द्यांवर आपण प्रथम चर्चा करूया. पहिला मुद्दा म्हणजे या रस्त्यासंदर्भातील तुमच्या न्यायालयाने खटल्यासाठी जी कांही कागदपत्रे तुम्हाला हवी आहेत ती मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. यावर मागील वेळी ही आपली चर्चा झाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. त्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने केला जाईल, अधिकाऱ्यांसोबत संबंधित जागांची पाहणी करून त्या संदर्भात निर्णय घेईल. तिसरी गोष्ट म्हणजे कायद्यानुसार या रस्त्याच्या बाबतीत जर कोणाची जमीन गेली नसेल तर त्यांचे नांव अधिसूचने मधून हटवले जाईल. तसेच ज्यांची जमीन गेली आहे, त्यांना नोटीस जारी करून त्यांच्या जमिनीचा सर्व्हे नंबर अधिसूचनेमध्ये समाविष्ट केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले की, माझ्यासह संबंधित अन्य अधिकाऱ्यांनी आम्ही आज सकाळी हलगा -मच्छे बायपास रस्त्याची पाहणी करण्यास आलो आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या समोर या रस्त्यासंदर्भात आपल्या अनेक तक्रारी व समस्या मांडल्या आहेत. न्यायालयीन वाद असल्यामुळे सदर रस्त्याचे काम केले 10 वर्षांपासून बंद पडले होते. मात्र आता उच्च न्यायालयाकडून आम्हाला आदेश मिळाले असून त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बायपास रस्त्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे आमच्यासमोर मांडले आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे गेल्या 2011 मध्ये या रस्त्यासंदर्भात जे सर्वेक्षणचे काम झाले ते काम वास्तवाला धरून करण्यात आलेले नाही. रस्ता एका भागातून जातो आणि अधिसूचना दुसऱ्या सर्व्हे नंबरचे झाले आहे. या संदर्भात मी माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्या चर्चेअंती ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा वाद आहे. त्या त्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम केले जाईल. याव्यतिरिक्त वडगाव व येळ्ळूर मधून जाणाऱ्या या रस्त्याच्या ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी कोणता तांत्रिक उपाय करायचा? यावर संबंधित ठिकाणची पाहणी केल्यानंतर मी विचार करेन. याखेरीस सदर रस्त्याप्रकरणी दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची तिसरी फेरी सुरू आहे. खटल्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आमच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जाईल, असे आश्वासन मी शेतकऱ्यांना दिले आहे. एकंदर या तीन मुद्द्यांवर जिल्हा प्रशासन सध्या काम करणार आहे. शेतकरी हे आमचे बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांच्या कृषी उत्पादनाच्या कामाला कधीही कमी लेखलेले नाही असे स्पष्ट करून आज सदर रस्त्याच्या पाहणी अंती कांही निर्णय घ्यावयाचे आहेत ते मी कायद्याच्या चौकटीत घेणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.


