बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावचा प्रशासकीय बोजवारा: विकास की केवळ विटंबना? बेळगाव शहर सध्या अभूतपूर्व अशा प्रशासकीय अनागोंदीतून जात आहे. एकेकाळी शांत आणि नियोजित असलेली ही नगरी आता अव्यवस्था आणि गैरसोयींचे केंद्र बनू पाहत आहे. बेळगाव महानगरपालिकेचा कारभार, महानगरपालिकेच्या तिजोरीवरील संकट आणि कुठल्याच गोष्टीचा कुठल्याच गोष्टीशी नसलेला ताळमेळ पाहता, बेळगाव नगरीचा कारभार रामभरोसे चालला आहे असेच चित्र सध्या दिसत आहे. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीमुळे सध्या प्रत्येक बेळगावकरांमध्ये ‘महंमद बिन तुघलक’च्या तुघलकी कारभाराची चर्चा सुरू आहे.
बेळगाव शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही कामे नागरिकांच्या सोयीचा विचार न करता दिवसाढवळ्या केली जात असल्यामुळे शहरातील बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. अरुंद रस्त्यांवरील वाहनांची वाढलेली संख्या, बेशिस्त वाहतूक आणि अयोग्य सिग्नल यंत्रणा यामुळे ही कोंडी विकोपाला गेली आहे. एखादा नियम लागू झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर असणारा रहदारी पोलीस विभाग, खड्डेमय रस्ते आणि वाहतुकीच्या बेशिस्ततेकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. राणी चन्नम्मा चौकात आंदोलनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्ते बंद केल्यामुळे वाहनचालकांना सोसावा लागणारा नाहक भुर्दंड, याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. बेळगावकर या वाहतूक कोंडीमुळे आता अक्षरशः वैतागले आहेत.
शहरात सध्या जी विकास कामे राबवली जात आहेत, त्या कामांची गुणवत्ता अत्यंत सुमार आहे. ब्रिटिशकालीन इमारती आजही सुस्थितीत असताना, अलीकडेच झालेल्या विकास कामांची अवस्था अत्यंत वाईट आहे. विकास कामे राबवण्यात जेवढा खर्च होतो, त्याहून अधिक खर्च त्यांची अकाली होणारी दुरावस्था सुधारण्यासाठी करावा लागत आहे. विकास कामांच्या नावाखाली चाललेली तोडफोड, वृक्षतोड आणि रस्ते रुंदीकरणासाठी करण्यात येणारे मालमत्ता संपादन इतक्या सर्व गोष्टी होऊन देखील विकास मात्र शून्य आहे. विकास कामांसाठी खर्च होणारा अमाप निधी आणि त्याचा कार्यक्षम वापर नसणे, यामुळे बेळगाव महानगरपालिकेची अवस्था सध्या ‘पांढरा हत्ती पोसल्यासारखी’ झाली आहे. महानगरपालिकेचा ‘अ’पारदर्शक चाललेला व्यवहार आणि यंत्रणेतील ताळमेळ नसणे, हे या समस्येचे मूळ कारण आहे असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
पावसाळा सुरू होताच खड्ड्यांची मालिका आणि रस्त्यांची दुरावस्था सुरू होते. पावसाळा संपल्यावर तात्पुरत्या डागडुजीमुळे धुळीचे साम्राज्य पसरते. वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, धुळीचे साम्राज्य आणि अपघातांची वाढलेली संख्या या सर्व गोष्टी पाहता नागरिकांकडून प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या मूलभूत नागरी समस्यांकडे प्रशासनातील सर्वच विभागांचे दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर, बेळगाव शहर परिसरात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. पोलिसांकडून गांजा, मटका, जुगार खेळणाऱ्या लोकांवर सातत्याने कारवाई होत असतानाही या अवैध धंद्यांना इतका मोठा वाव कुठून मिळतो, हा प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेवर शंका निर्माण करतो.
सध्या बेळगावचे लोकप्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील ‘हमारी-तुमरी’च्या राजकीय संघर्षात अडकले आहेत. सरकारी कामकाज आणि कार्यक्रमांच्या उपक्रमांमध्ये ते व्यस्त आहेत. आरोप-प्रत्यारोपांमध्ये त्यांचे लक्ष केंद्रित झाल्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. या राजकीय संघर्षात आणि प्रशासनाच्या उदासीनतेत सर्वसामान्य नागरिकांची अवस्था “दोघांच्या भांडणात, तिसऱ्याचे तेल जळते” अशी झाली आहे. बेळगावकरांवर सध्या “भिक नको, पण कुत्रा आवर” असे म्हणायची वेळ आली आहे. प्रशासनाने या समस्यांवर तातडीने लक्ष दिले नाही, तर जनक्षोभ आणि नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल, यात तिळमात्र शंका नाही…!



