बेळगाव लाईव्ह : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीनई घाट पारडा रस्ता क्रॉसजवळील पुलाखालील पाण्यात खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. दुर्गा नगर, नंदगड, ता. खानापूर) अशी झाली असून, त्या अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत होत्या.
रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. प्राथमिक तपासात महिलेच्या चेहरा व डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार खून असण्याची शक्यता वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पाटील या २ ऑक्टोबर रोजी गावातील टेम्पोतून कक्केरी येथील यात्रेसाठी गेल्या होत्या. यात्रा आटोपल्यानंतर परत येताना बिडी येथे काम असल्याचे सांगून त्या टेम्पोतून उतरल्या. मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा काहीच संपर्क न आल्याने मुलाने नंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत त्यांच्या मोबाईलमधून दोन संदेश आढळले आहेत. एका संदेशात “मी आत्महत्या करत आहे” असे तर दुसऱ्या संदेशात “मी बेंगलोरला जात आहे” असे लिहिलेले होते. त्यामुळे या मृत्यूमागे खून आहे की आत्महत्या, याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
सदर प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांकडून सुरू असून, उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

