बेळगाव लाईव्ह : बेळगावकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे नव्याने बांधलेले अत्याधुनिक स्मार्ट बसस्थानक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आज उत्साहात लोकार्पित करण्यात आले.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ४९.८ कोटी रुपये खर्चून साकारलेले हे प्रकल्प बेळगावच्या सार्वजनिक वाहतुकीच्या विकासात महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
सुमारे २.१९ गुंठे जागेवर उभारण्यात आलेल्या या बसस्थानकात एकूण २८ फलाट, सरकते जिने, लिफ्ट, सुसज्ज व्यावसायिक संकुल, स्वच्छतागृहे, बेसमेंट पार्किंग, तीन मजली इमारत, आणि विभागीय कार्यालये यांचा समावेश आहे.
बेळगाव शहरात लवकरच १०० इलेक्ट्रिक बसेस कार्यरत होतील, जे प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्थेकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. “शिक्षण हीच खरी शक्ती आहे. शिक्षणामुळेच स्वातंत्र्य मिळू शकते. त्यामुळे दलित, मागासवर्गीय आणि सर्वच समाजघटकांनी उच्च शिक्षण घ्यावे,” असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या भाषणात केले.
बेळगाव स्मार्ट बसस्थानकामध्ये एकूण २८ फलाट असून शहर व परिसरात जाणाऱ्या बससेवेसाठी फलाटांचे नियोजन करण्यात आले आहे. नव्या बसस्थानकातून शहर आणि उपनगरात सुटणाऱ्या बसांसाठी ठराविक फलाट निश्चित करण्यात आले आहेत. फलाट क्रमांक १ वरून वडगाव आणि अनगोळ या दिशेने जाणाऱ्या शहर परिवहन बसेस सुटतील.
फलाट क्रमांक २ वरून उद्यमबागकडे जाणाऱ्या बसेस रवाना होतील, तर फलाट क्रमांक ३ वरून ए.पी.एम.सी.साठी सेवा उपलब्ध असेल. वंटमुरी, रामतीर्थनगर आणि कणबर्गीकडे जाणाऱ्या बसेस फलाट क्रमांक ४ वरून सुटतील. याशिवाय, सुवर्ण सौधकडे जाणाऱ्या बसेससाठी फलाट क्रमांक ५ वापरण्यात येईल आणि सुळेभावी, करडीगुद्दी तसेच मारीहाळ या ठिकाणी जाणाऱ्या बसेस फलाट क्रमांक ६ वरून प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. अशा प्रकारे प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकात सेवा अधिक सुलभ व सुव्यवस्थित करण्यात आली आहे.
विभागीय नियंत्रणाधिकारी के. एल. गुडन्नवर यांनी प्रवाशांना आवाहन केले की, या ‘स्मार्ट’ बसस्थानकाची स्वच्छता राखण्यासाठी आणि अत्याधुनिक सेवांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, मंत्री शरण प्रकाश पाटील, एम. सी. सुधाकर, तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.



