बेळगाव लाईव्ह : मराठा इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात आयोजित करण्यात आलेली शौर्यवीर रन म्हणजे “स्पिरिट ऑफ द इन्फंट्री” होय तेच धैर्य, सहनशक्ती आणि एकतेचा उत्सव – यांचे प्रतीक आहे असे प्रतिपादन मराठा रिजिमेंटचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केले.
रविवारी सकाळी बेळगावातील मराठा सेंटर तर्फे शौर्यवीर रन 2025 या प्रेरणादायी धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन केल्यावर बोलत होते. 26 ऑक्टोबर 2025 रोजी MLIRC, शिवाजी स्टेडियम, बेळगाव येथे धाव स्पर्धेचे करण्यात आले. भारतीय सेनेच्या 79व्या इन्फंट्री डे निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. मुखर्जी यांनी सहभागींच्या उल्लेखनीय उत्साहाचे व कार्यक्रमाच्या अत्यंत शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक करत शौर्य वीर रन म्हणजे पायदळाच्या शौर्याला वाहिलेली श्रद्धांजली होय.
अत्यंत अचूक नियोजन आणि व्यावसायिकतेने आयोजित केलेली ही स्पर्धा MLIRC च्या शिस्त, मानक आणि समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण ठरली. मार्ग व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वैद्यकीय सहाय्य, अतिथी सेवा आणि सहभागींना दिलेला अनुभव – प्रत्येक घटकाने आयोजक टीमच्या अथक प्रयत्नांची आणि सैनिकांच्या बांधिलकीची साक्ष दिली. यावेळी विविध गटातील विजेत्याना प्रमाणपत्र बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमात सेवेत असलेले सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसह विद्यार्थी आणि बेळगावातील नागरी समाजातील फिटनेसप्रेमी नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. “रन फॉर द ब्रेव्ह” या घोषवाक्याखाली सर्वजण एकत्र धावले. अर्ध मॅरेथॉन (21 कि.मी.), टायम्ड रन (10 कि.मी.) आणि फन रन (5 कि.मी.) या तीन विभागांमध्ये सर्व वयोगटांतील आणि फिटनेस पातळीवरील लोकांसाठी सहभाग खुला ठेवण्यात आला होता. झुंबा वॉर्म-अप, प्रेक्षकांचा जल्लोष आणि देशभक्तीच्या वातावरणाने सकाळ अधिक रंगतदार बनवली.
शौर्यवीर रन 2025 ला व्यापक प्रशंसा आणि माध्यमांमधून मोठे कव्हरेज मिळाले. या कार्यक्रमाने राष्ट्रीय अभिमान, आरोग्यजागरूकता आणि भारतीय पायदळ दलाबद्दल कृतज्ञतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.
ही फक्त एक स्पर्धा नव्हती — तर सैनिक आणि नागरिकांमधील ऐक्याचे भावपूर्ण प्रदर्शन होते — धैर्य, शिस्त आणि त्यागाच्या त्या अमर आत्म्याला वाहिलेला अभिवादन, जो भारतीय पायदळ दलाची खरी ओळख आहे.



