बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ‘जय किसान’ या खासगी भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षात अखेर शेतकरी आणि एपीएमसीच्या बाजूने मोठा विजय मिळाला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निर्णयाने खासगी ‘जय किसान मार्केट’ला जोरदार दणका दिला असून, त्यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत.
या याचिकांमध्ये जय किसान मार्केटने त्यांचा व्यापारी परवाना रद्द करण्याच्या कृषी खात्याच्या निर्णयाला आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना सरकारी एपीएमसी मार्केटमध्ये हलवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांच्या खंडपीठाने २५/०९/२०२५ रोजी सविस्तर सुनावणीनंतर राखून ठेवलेला हा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामुळे कृषी पणन विभाग आणि एपीएमसी मार्केटची कार्यवाही पूर्णपणे वैध ठरली आहे.

हा निर्णय म्हणजे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांसाठी मोठा विजय मानला जात असून, नियामक आणि पारदर्शक एपीएमसी कायद्यांतर्गतच केलेला व्यापार योग्य असल्याचे न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट केले आहे. योग्य प्राधिकरणाशिवाय कार्यरत असलेला जय किसान खासगी मार्केट आता कायदेशीररित्या अपात्र ठरला आहे.
शेतकरी नेते सिद्दागौडा मोदगी यांच्यासह अन्य नेत्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी आणि एपीएमसी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. भूवापर परवाना रद्द बाबतही ‘जय किसान’ मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हानात्मक याचिका दाखल केली असून या याचिकेवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


