बेळगाव लाईव्ह : सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून आलेल्या खासदार जगदीश शेट्टर यांनी अखेर आपले खरे रंग दाखवले आहेत. दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली पाळत असलेल्या ‘काळा दिना’ला जोरदार विरोध करत या लोकप्रतिनिधीने थेट मराठी एकीकरण समितीवरच तोंडसुख घेतले आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे.” १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्योत्सव दिन असल्याने, या दिवशी ‘काळा दिन’ कुणीही पाळू नये आणि उलट मराठी भाषिकांनीही कर्नाटक राज्योत्सवात सहभागी व्हावे, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे.
“महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला मराठी भाषिकांचाच पाठिंबा नाही.” समितीनेच बेळगावमध्ये मराठी-कन्नड वाद निर्माण केल्याचा आरोप करत त्यांनी समितीवर आगपाखड केली. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे निकाल येईपर्यंत वाट बघावी असे सांगत गरजच पडल्यास “महाराष्ट्रात काळा दिन साजरा करा,” असा अजब सल्ला दिला. यावेळी त्यांनी सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित करून महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत महाजन अहवालानुसार सोलापूर, जत सारखे भाग कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी केली.
खासदार जगदीश शेट्टर यांच्या या वक्तव्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी मतांवर निवडून येऊनही मराठी अस्मितेलाच विरोध केल्याबद्दल या लोकप्रतिनिधीवर जोरदार टीका होत आहे. शिवाय अशा लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता तरी जागे व्हावे, अशी भावना कट्टर मराठी माणसात व्यक्त होत आहे.




