बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे कायदा आणि संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांनी सीमावादाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे सीमाभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एच. के. पाटील यांनी महाजन अहवालाचा आधार घेत सीमाप्रश्न आता संपल्याचे जाहीरपणे वक्तव्य केले. राज्याच्या स्थापनेचा राज्योत्सव हा केवळ भाषिक नव्हे, तर ‘कर्नाटक’ राज्याचा गौरवशाली उत्सव आहे. तसेच, कन्नड भाषिकांच्या मागणीनुसार त्यांची भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी सरकार सर्वतोपरी कटिबद्ध असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
‘काळा दिवस’ आयोजनावर कारवाईचा इशारा देत ते म्हणाले, कर्नाटक एकीकरणाच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी जर कोणी ‘काळा दिवस’ आयोजित करण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा अन्य कोणतीही संघटना ‘बॅन’ करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार सरकारसमोर नसल्याचेही स्पष्ट केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगावमधील सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन होणार असून, त्यासंबंधीची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

