बेळगाव लाईव्ह:बेळगावमधील मराठी सीमा बांधव हिंसक पद्धतीने कधीही आंदोलन करत नाहीत. त्यामुळे कर्नाटक सरकारने कोणत्याही पद्धतीची दडपशाही मराठी माणसावर करू नये, असे कर्नाटक प्रशासनाला स्पष्ट आवाहन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केलं. बेळगावचे ज्येष्ठ नगरसेवक, समाजसेवक आणि मराठा समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व नेताजी नारायणराव जाधव यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन आज रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिरात करण्यात आले होते त्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लावली त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे प्रकाश मरगाळे होते.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत स्थानिक प्रशासनाने मराठी भाषिकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. “महाराष्ट्र सरकार तमाम सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, याबाबत सीमा भागातील मराठी भाषिकांनी कोणतीही साशंकता बाळगू नये,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की “महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील हा वाद दिल्लीत सुप्रीम कोर्टात गेला आहे. या देशात ‘भिजत घोंगडं’ ठेवून प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, ही वृत्ती सर्वच राज्यकर्त्यांमध्ये आहे. एकदा सुप्रीम कोर्टात खटला गेला की, आपले काम संपले अशी मानसिकता तयार झाली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारे आली, पक्ष फुटले, राज्यकर्ते बदलले, परंतु अद्यापही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबितच आहे. अशावेळी सर्वोच्च न्यायालयाने सीमाप्रश्नासारख्या महत्त्वाच्या आणि जुन्या याचिकेवर तातडीने कामकाज करून लवकरात लवकर निर्णय देण्याची गरज आहे.”

नेताजी जाधव यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी “ज्यांचे आयुष्य कष्टात गेले आहे, त्यांच्यासाठी हे क्षण फार महत्त्वाचे असतात. नेताजी जाधव यांच्या वडिलांनी कारकून म्हणून काम करत या भागातील लग्ने जुळवण्याचे काम केले. चपला झिजेपर्यंत त्यांनी अनेक लग्नगाठी बांधल्या आहेत आणि हा त्यांच्या घराण्याचा इतिहास आहे.
बेकरी व्यवसायाचे नेतृत्व करून बेकरी व्यावसायिकांचा कर माफ करून घेण्याचे महत्त्वपूर्ण काम नेताजी जाधव यांच्या माध्यमातून झाले आहे. पत्रकार म्हणून महानगरपालिकेत सभेला हजर राहून वर्तमानपत्रात इतिवृत्तांत सादर करण्याचे आणि सीमाप्रश्नावर महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी चंदगड येथे आंदोलन करण्याची त्यांची भूमिका प्रभावी ठरली, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी अनंत लाड,रणजीत चव्हाण पाटील,राजाराम सूर्यवंशी,प्रकाश अष्टेकर दीपक वाघेला आदींनी नेताजी जाधव यांच्या कार्याबद्दल मनोगत मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेताजी जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘मी नेताजी बोलतोय’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करताना नेताजी जाधव म्हणाले की, “आजवरच्या माझ्या प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणात माझ्या कुटुंबीयांनी मोठा आधार दिला. मला घडवण्यात माझ्या आई-वडिलांचा आणि पत्नीचा मोलाचा वाटा आहे.” नगरसेवक म्हणून कार्यरत असताना केवळ आपल्या प्रभागाचाच नाही, तर संपूर्ण बेळगाव शहराच्या विकासाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि दि बेळगाव बेकर्स को-ऑप. सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी हांगीरकर, पायोनियरचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, माजी आमदार मनोहर किनेकर,माजी आमदार दिगंबर पाटील, उपस्थित होते. शिवराज पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला नागरिक, विविध विभागांतील मान्यवर, सहकार क्षेत्रातील आणि मराठा समाजातील प्रमुख व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभाकर भाकोजी यांनी आभार मानले.


