बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहर आणि सीमाभागात दिवाळीची संकल्पना, परिमाणे बदलली आहेत. एकेकाळी दिवाळी म्हटलं की, गल्लीत सुरू होणारी किल्ले बनवण्याची लगबग, माती गोळा करण्याची धडपड आणि अंगणात उभारला जाणारा भव्य किल्ला आठवत असे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आणि फ्लॅट संस्कृतीमुळे मुलांना मातीत खेळण्यासाठी लागणारी मोकळी जागा आणि मातीची उपलब्धता ही एक मोठी समस्या बनली आहे. विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगले उभारली जात असताना, आपली ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी यावर्षी बाजारपेठेत किल्ल्यांच्या तयार प्रतिकृती दाखल झाल्या आहेत. यामुळे बचेकंपनी आणि शिवप्रेमींच्या उत्साहामध्ये कोणतीही कमतरता आलेली नाही.
दिवाळीची आपली महान परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी किल्ले बनवण्यासाठी माती तरी कुठून मिळवायची? यावर मात करण्यासाठी यंदा बाजारात किल्ल्यांच्या तयार प्रतिकृती दाखल झाल्या असून, लहानग्या बालचमूकांकडून आणि शिवप्रेमींकडून मोठी मागणी होत आहे. शहरातील अनेक कुटुंबांमध्ये जागेअभावी आणि वेळेच्या कमतरतेमुळे पारंपरिक पद्धतीने किल्ला बनवणे शक्य होत नाही. अशावेळी, तयार किल्ल्यांच्या प्रतिकृती एक आदर्श पर्याय म्हणून समोर आल्या आहेत. मातीचे महत्त्व आणि गडाची भव्यता मुलांना समजावून सांगण्यासाठी तयार मॉडेल्सचा आधार घेतला जात आहे.
बेळगावमधील मारुती गल्ली येथील खेळणी विक्रेते अमोल पुजारी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ”फ्लॅट संस्कृती आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे मुलांनी मातीत खेळणे बंद केले आहे. अपुऱ्या जागेमुळे घराच्या अंगणात किल्ले बनवणे देखील कमी झाले आहे. अशावेळी आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी किल्ल्यांच्या तयार प्रतिकृती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. या प्रतिकृतींना यंदा मोठी मागणी आहे. बाजारात विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती उपलब्ध झाल्या आहेत. ‘किल्ले प्रतापगड, किल्ले रायगड, किल्ले पन्हाळगड यांसारख्या अनेक गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बाजारात दाखल झाल्या आहेत. याशिवाय, किल्ल्यासाठी लागणारे दरवाजे, बुरुज, तोफा, हत्ती, घोडे, मावळे यांसह सर्व साहित्य उपलब्ध आहे. पन्नास रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या साहित्याची किंमत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध स्वरूपातील मूर्तींना देखील मोठी मागणी आहे, ‘पाच इंचापासून ते अडीच ते तीन फुटांपर्यंत शिवमुर्ती उपलब्ध आहेत. यंदा सिंहासनावरील शिवमुर्तींना अधिक मागणी आहे. आपला व्यवसाय वडिलोपार्जित असून, दरवर्षी बालचमू आणि शिवप्रेमी यांच्याकडून खेळणी खरेदीसाठी मोठा प्रतिसाद मिळतो,” असे अमोल पुजारी यांनी सांगितले.
फ्लॅट संस्कृतीमुळे किल्ले बनवण्याची सामुदायिक मजा आणि मातीतील खेळ कमी झाले असले तरी, तयार प्रतिकृतींच्या माध्यमातून शिवरायांची शौर्यगाथा जपण्यासाठी बेळगावातील लहानगे आणि शिवप्रेमी उत्साहाने तयारी करत आहेत.



