Friday, December 5, 2025

/

बेळगावच्या कवीचे पुण्यात काव्य संग्रहाचे प्रकाशन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कविता हा आत्म्याचा उद्गार असतो. तो आत्म्याशी केलेला संवाद असतो आणि स्वतःमध्ये खोल उतरून घेतलेला शोध असतो. या प्रवासात कोण किती तीव्रतेने खोल उतरतो यावर कवितेचे सौंदर्य अवलंबून असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले.
ओशन वेव्हज पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या कवी अवधूत जोशी लिखित ‘गाज’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुजाता महाजन, ‘शब्दसारथी’चे संचालक पराग पोतदार व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी अंजली कुलकर्णी म्हणाल्या, अवधूत जोशी यांच्या कवितांची भाषा अनोखी, अस्सल आणि स्वयंभू आहे. त्यांच्या कविता म्हणजे लखलखीत सोने आहे. एक वेगळ्या प्रकारची ताजी टवटवीत अशी अभिव्यक्ती आहे.

अस्तित्व शोध हा या कवितांचा गाभा आहे. दुःखाची दुखरी नस पकडण्याचा ध्यास कवीला असावा लागतो तो अवधूत यांच्या कवितांमध्ये आहे. त्यामुळे ती आत्मशोधाचा प्रत्यय देणारी कविता आहे.
पराग पोतदार म्हणाले, अवधूत यांच्या कवितेमधील आर्तता पाहता कविता हाच अवधूत यांचा श्वास आहे असे लक्षात येते. ही गवसलेली सर्जनशीलतेची वाट त्यांनी सोडू नये. या मार्गावर सतत पुढे जात राहावे.
कवी अवधूत जोशी यांनी त्यांच्या काही कविता सादर केल्या. ते म्हणाले, आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मला माझ्याच कवितांकडे नव्याने पाहता आले. या पुढील काळात हा लेखन प्रवास थांबू देणार नाही.
प्रज्ञा वझे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मीनल पेंडसे जोशी, वैभव लोकूर, श्रुती परांजपे यांनी काव्यवचन केले. मकरंद जोशी यांनी आभार मानले.

मूळचे बेळगावचे सध्या पुणे येथे वास्तव्यस असलेले ठळकवाडी हायस्कूलचे माजी विद्यार्थी कवी अवधूत जोशी यांनी मराठी हिंदी आणि उर्दू भाषेतील गाज हे काव्यसंग्रह लिहिले आहे. या काव्यसंग्रहाचा कविता वाचन कार्यक्रम “अवतरण” येत्या 19 सप्टेंबर रोजी वर्णेकर नाट्य संघाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.