बेळगाव लाईव्ह : बेळगाव: शहरातील अमन नगर आणि न्यू गांधी नगर येथील रेल्वे फाटकावर प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत नागरिकांनी आपापल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या, ज्यामुळे या प्रकल्पाबद्दल स्थानिक रहिवाशांमध्ये भिन्न मते असल्याचे स्पष्ट झाले.
अमन नगर येथील रेल्वे फाटकावर उड्डाण पूल बांधण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे, ज्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. अमन नगरच्या रहिवाशांनी उड्डाण पूल बांधल्यास तो फायदेशीर ठरेल अशी भूमिका घेतली आहे.अमन नगर कडून एजाज हकीम यांनी रेल्वे उड्डाणपुलाला पाठिंबा दर्शवत भविष्यात रेल्वेची संख्या वाढणार त्यामुळे ब्रिज होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
याउलट, न्यू गांधी नगरच्या रहिवाशांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. नगरसेवक अजीम पटवेगार यांनी न्यू गांधी नगरच्या लोकांच्या समस्या मांडताना स्पष्ट केले की, येथील नागरिकांना उड्डाण पूल किंवा भिंत यापैकी काहीही नको आहे. त्यांच्या मते, यामुळे त्यांच्या परिसरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या परस्परविरोधी मतांवर विचार करून आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, आगामी चार दिवसांत संबंधित विभागाचे अधिकारी आणि दोन्ही परिसरातील प्रतिनिधींसोबत आणखी एक बैठक घेऊन यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीतून या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचा मार्ग कसा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


