बेळगाव लाईव्ह : पिरनवाडी गावातील सर्व्हे नं. 21 मधील 12 एकर 10 गुंठे गावठाण जमिनीपैकी 5 गुंठे जमीन कन्नड, मराठी व उर्दू शाळेच्या इमारतीसाठी आणि 2 गुंठे जागा समाज भवनासाठी मंजूर करण्यात यावी, अशी मागणी पिरनवाडी येथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या पिरनवाडी येथील नागरिकांनी विशेष करून महिलांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.
पिरनवाडी येथील सरकारी कन्नड शाळा सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा आणि सरकारी उर्दू उच्च प्राथमिक शाळा या तीनही शाळा जांबोटी मार्गावर म्हणजे राष्ट्रीय महामार्ग शेजारी आहेत. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात या तीनही शाळांच्या आसपास मोठी वसाहत निर्माण झाली आहे. परिणामी शाळेमधील शिक्षण देण्यासाठी आवश्यक शांत वातावरण नाहीसे झाले आहे. वसाहतीतील रहदारी, गोंगाट आणि महामार्गावरील सतत ये -जा करणाऱ्या वाहनांच्या व त्यांच्या हॉर्नच्या आवाजामुळे मुलांना शिक्षण घेणे आणि शिक्षकांना मुलांना शिकवणे कठीण झाले आहे.
या शाळांना स्वतःचे असे मैदानही नाही. शाळेसमोरील जी कांही थोडीफार खुली जागा आहे त्या ठिकाणी वाहने पार्क केली जात असतात. एकंदर या शाळांमध्ये शिक्षकांना शिक्षण देणे आणि मुलांना शिक्षण घेणे कठीण तर झालेच आहे शिवाय सर्वात गंभीर बाब म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी महामार्गाचा वापर केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अवजड वगैरे वाहनांची सततची रहदारी असणाऱ्या महामार्गावरून मुला मुलींना ये-जा करावी लागत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन सर्व्हे नं. 21 मधील 12 एकर 10 गुंठे गावठाण जमिनीपैकी 5 गुंठे जमीन कन्नड, मराठी व उर्दू शाळेच्या इमारतीसाठी आणि 2 गुंठे जागा समाज भवनासाठी मंजूर करण्यात यावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

गावकऱ्यांच्या मागणी संदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना पिरनवाडीचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी मुचंडीकर यांनी सांगितले की, आमच्या पिरनवाडी गावात कन्नड मराठी उर्दू अशा तीन शाळा आहेत. मात्र या तीनही शाळा जांबोटीच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी आहेत. या खेरीज अलीकडच्या काळात या शाळांच्या आसपासची वसाहत देखील वाढली आहे.
या पद्धतीने भरवस्तीत आणि महामार्ग शेजारी असल्यामुळे त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना होत आहे. वसाहतीतील रहदारी, गोंगाट आणि महामार्गावरील सतत ये -जा करणाऱ्या वाहनांच्या व त्यांच्या हॉर्नच्या आवाजामुळे मुलांना शिक्षण घेणे आणि शिक्षकांना मुलांना शिकवणे कठीण झाले आहे. त्यामुळे सदर शाळांसाठी गावातील सर्व्हे नं. 21 मधील 12 एकर 10 गुंठे गावठाण जमिनीपैकी 5 गुंठे जमीन कन्नड, मराठी व उर्दू शाळेच्या इमारतीसाठी आणि 2 गुंठे जागा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता समाज भवनासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी आमची सरकारला विनंती आहे.
शिवसेना बेळगाव तालुकाप्रमुख सचिन गोरले यांनी देखील पिरनवाडी गावात कन्नड, मराठी आणि उर्दू शाळांच्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीची माहिती देऊन सदर शाळांसाठी संबंधित 5 गुंठे जागा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले याप्रसंगी पिरनवाडी येथील स्त्री-पुरुष नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी सचिन गोरले पिराजी मुचंडीकर अंसार हुबळीवाले मुन्ना नबीवाले यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते.



