राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावचे वर्चस्व पटकावले अजिंक्यपद!

0
37
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य हौशी ज्युडो संघटनेच्या आश्रयाखाली बेळगाव जिल्हा हौशी ज्युडो संघटनेतर्फे बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या 1ल्या कर्नाटक खुल्या राज्यस्तरीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना बेळगाव जिल्ह्याने एकूण 47 सुवर्ण, 21 रौप्य आणि 25 कांस्य पदके अशी एकूण तब्बल 93 पदकांची लयलूट करत स्पर्धेतील मुला -मुलींच्या दोन्ही गटाचे सर्वांकष सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले.

शहरातील कॉलेज रोडवरील गांधीभवन येथे गेल्या 25 ते 27 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेली सदर स्पर्धा काल रविवारी सायंकाळी यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 470 ज्युडो खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता. स्पर्धा 8 ते 10 वर्षे गट, 10 ते 12 वर्षे गट, 12 ते 15 वर्षे गट, 15 ते 17 वर्षे गट, 17 ते 21 वर्षे गट आणि 21 वर्षावरील गट अशा सहा विविध वयोगटात घेण्यात आली.

या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बेळगावसह विजापूर, बागलकोट, गदग, गुलबर्गा, कारवार, बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, मंडया, हासन, मंगळूर, म्हैसूर, बिदर, कोलार, बेळ्ळारी व शिमोगा या जिल्ह्यांचा सहभाग होता. सलग तीन दिवस आयोजित या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसा दाखल 272 (सुवर्ण, रौप्य, कांस्य) पदके प्रदान करण्यात आली.

 belgaum

बेळगावात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेवर बेळगाव जिल्ह्याने निर्विवाद वर्चस्व राखताना सर्वाधिक 47 सुवर्ण, 21 रौप्य आणि 25 कांस्य पदके पटकावली. बेळगाव खालोखाल बागलकोट जिल्ह्याने 7 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदके मिळविली, तर इतर जिल्ह्यांनी केलेली पदकांची कमाई (अनुक्रमे जिल्ह्याचे नांव, सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक यानुसार) पुढील प्रमाणे आहे. विजापूर -5, 1, 4. गदग -6, 3, 1. कारवार -3, 2, 1. मंगळूर -4, 2, 10. मंड्या -2, 5, 6. बंगळूर ग्रामीण -3, 2, 1. बेंगलोर शहर -2, 3, 3. गुलबर्गा -1, 1, 1. शिमोगा -1, 1, 1. म्हैसूर 1, 0, 8.

सदर राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कर्नाटक राज्य हौशी ज्युडो संघटनाच्या मार्गदर्शनाखाली आणि बेळगाव जिल्हा हौशी ज्युडो संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या अन्य पदाधिकारी, सदस्य व पंचमंडळींसह विशेष करून डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील आणि कुतुजा मुल्तानी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कर्नाटकात ज्युडो खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ही अजिंक्यपद स्पर्धा एक महत्त्वपूर्ण पाऊल असून जी तरुण खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.