बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य सरकारी वाहने वापरण्याचा एक ठराविक शिष्टाचार आहे. मात्र बेळगावमध्ये हा शिष्टाचार धाब्यावर बसून पात्रता नसलेल्या लोकांकडून त्यांच्या वाहनांवर ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ किंवा ‘गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक’ या पाटीचा सर्रास वापर केला जात असल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
बेळगाव शहरातील बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी अथवा वन-वेमध्ये सरकारी वाहने रहदारीला अडथळा करत खुशाल थांबलेली आढळून येतात हे सर्वश्रुत आहे. सर्वसामान्य वाहन चालकांना या ना त्या क्षुल्लक कारणावरून वेठीस धरणारे रहदारी पोलीस रस्ता अडवून गैरसोय निर्माण करणाऱ्या त्या सरकारी वाहनांकडे मात्र कानाडोळा करत असतात.
रहदारी नियम भंग करून रस्ता अडवून थांबलेले संबंधित वाहन सरकारी असल्यामुळे कोणीच सहसा त्याच्या वाटेला जात नाही. संबंधित वाहन खरोखर त्या पात्रतेच्या व्यक्तीचे आहे का? किंवा तो स्वतः त्या वाहनात उपस्थित आहे का? याची कोणीच शहानिशा करत नाही. हीच मेख लक्षात घेऊन अलीकडे शहरात ‘गव्हर्मेंट ऑफ इंडिया’ किंवा ‘गव्हर्मेंट ऑफ कर्नाटक’ या पाटीचा गैरफायदा घेतला जात असल्याचा जागरूक नागरिकांचा आरोप आहे.
केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वाहन वापरताना काही विशिष्ट नियम आणि शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे. हे नियम सुरक्षितता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर सुनिश्चित करतात. शासकीय वाहन फक्त शासकीय कामासाठीच वापरावे असा नियम आहे. केंद्र आणि राज्य सरकारी वाहनांसाठी फलक लावताना काही संकेत पाळणे आवश्यक आहे.
सरकारी वाहनांवर विशिष्ट फलक (नंबर प्लेट) लावले जातात, जेणेकरून ते ओळखता येतील. या फलकांवर राज्याचे नाव, विभाग आणि नोंदणी क्रमांक असतो. केंद्र आणि राज्य सरकारी वाहनांचे फलक (नंबर प्लेट) रंग वेगवेगळे असतात. केंद्र सरकारच्या वाहनांसाठी फलकाचा रंग पांढरा असतो, त्यावर काळ्या रंगाने नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो. तर, राज्य सरकारच्या वाहनांसाठी फलकाचा रंग काळा असतो, त्यावर पांढऱ्या रंगाने नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो. मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ नियमानुसार भाड्याने वापरासाठी घेतलेल्या सरकारी वाहनांचा फलक पिवळा असतो. त्याप्रमाणे सरकारी गाड्या ‘जी’ पासिंगच्या असतात.
बेळगाव शहरासह जिल्ह्यातील कांही सरकारी अधिकाऱ्यांकडून उपरोक्त नियमांपैकी शासकीय वाहन फक्त शासकीय कामासाठीच वापरावे हा नियम सर्रास पायदळी तुडवला जात असल्याचे दिसून येते. संबंधित सरकारी वाहन सरकारी कामाव्यतिरिक्त कौटुंबिक बाजारहाट, खरेदी वगैरे वैयक्तिक कारणासाठी वापरली जातात. हा गैरवापर नामफलक आणि नंबर प्लेटच्या बाबतीतही पहावयास मिळतो. सरकारी कार्यालयात काम करणारे आणि नामफलक लावण्याच्या पात्रता निकषांमध्ये न बसणारे बऱ्याच जणांची वाहने सध्या बेळगाव शहरांमध्ये गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका फलकासह संचार करताना दिसतात. कहर म्हणजे सरकारी कार्यालयातील साधा शिपाई आपल्या वाहनावर गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका हा फलक मिरवत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यामुळे नागरिकांना सरकारची कीव येऊ लागली आहे. एवढेच नव्हे तर शहरातील कांही बँक कर्मचारी देखील आपल्या वाहनावर कर्नाटक सरकारचा नाम फलक लावून फिरताना दिसतात. एकंदर या पद्धतीने अलीकडे शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या नाम फलकांचा गैरवापर करत वाहनांचा बिनबोभाट संचार सुरू असतो.
सरकारी नाम फलक असणारी ही वाहने मनमानी करत कोठेही पार्क केली जातात. दुर्दैवाने पोलीसही त्यांच्याकडे कानाडोळा करतात. मध्यंतरी पत्रकार आणि प्रसिद्धी माध्यमांसाठी असणाऱ्या ‘प्रेस’ या अधिकृत शब्दाचा गैरवापर कांही जणांकडून केला जात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याविरुद्ध कारवाई सुरू केली होती. त्याचप्रमाणे वाहनांवर सरकारच्या नावाचा केल्या जाणाऱ्या गैरवापरावर पोलीस प्रशासनाची करडी नजर केंव्हा पडणार? याची प्रतीक्षा शहरातील जागरूक नागरिकांना लागून राहिली आहे.


