बेळगाव लाईव्ह :लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. आपल्या या भेटीप्रसंगी अभिनेते शिंदे यांनी साधलेला संवाद आणि केलेल्या मनोरंजनाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अत्यानंद मिळवून दिला.
शांताई वृद्धाश्रमातील संवादादरम्यान सयाजी शिंदे यांनी सर्व आजी-आजोबांना त्यांचा आगामी चित्रपट “ऑल इज वेल” पाहण्यासाठी आमंत्रित केले. मी तुमच्या सहवासाचा आनंद जितका घेतला तितकाच तुम्हीही या चित्रपटाचा आनंद घ्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
अभिनेते शिंदे यांच्या सदिच्छा भेटी प्रसंगीचे वातावरण आनंद, हास्य आणि मनापासूनच्या गप्पांनी भारले असल्यामुळे उपस्थित सर्वांसाठी हा दिवस संस्मरणीय बनला. त्यांच्या सन्मानार्थ एक छोटासा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला होता.
शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांनी सयाजी शिंदे यांच्या सदिच्छा भेटीबद्दल आणि त्यांनी सर्व आजी-आजोबांचे चेहरे उजळवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. संचालक अॅलन विजय मोरे, प्रसाद प्रभू आणि गंगाधर पाटील यांनी आश्रमाच्या पुस्तकाची प्रत, पारंपारिक शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सयाजी शिंदे यांचा सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी मोरे कुटुंबाकडून आश्रमातील वृद्धांची काळजी घेण्याच्या प्रशंसनीय कार्याचे कौतुक केले. आश्रमातील आजोबा आजींनी व्यक्त केलेल्या प्रेमामुळे आपण भावूक झाल्याचे सांगून त्यांनी सर्व आजींचे मायेची ऊब आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाला मारिया मोरे, चेरिल मोरे, नीलेश रामगावडे, शंकर पायनाचे, ऑल इज वेल चित्रपटाची टीम, हितचिंतक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सयाजी शिंदे यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट ही त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात एकता, करुणा आणि आनंदाचा एक सुंदर क्षण म्हणून जपली जाईल.