बेळगाव लाईव्ह :भरधाव दुचाकीने मालवाहू रिक्षाला धडक दिल्यामुळे आज शनिवारी सकाळी घडलेल्या अपघातात आपल्या गावातील शिवजयंती साजरी करून गोव्याला परत जाणार एक युवक जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव -गोवा महामार्गावरील चोर्ला गावाजवळ घडली.
मयत दुर्दैवी युवकाचे नांव विक्रम कोलेकर (वय 28, रा. कणकुंबी) असे असून तो बेळगावच्या केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (2016 -2020 बॅच) माजी विद्यार्थी होता.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम हा गोव्यामध्ये एका बँकेत नोकरीला होता. श्री शिवजयंती निमित्त मूळ गावाला छोटी भेट देऊन आज शनिवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून तो माघारी गोव्याला निघाला होता.
त्यावेळी चोर्ला गावाजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याच्या भरधाव दुचाकीची अशोक लेलँड मालवाहू रिक्षाशी धडक झाली. या अपघातात गंभीर दुखापत होऊन विक्रम जागीच गतप्राण झाला. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह खानापूर सिविल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला होता.

विक्रम कोलेकर यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या मित्रमंडळींना आणि माजी वर्गमित्रांना मोठा धक्का बसला असून त्यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघाताची खानापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
विक्रम हा त्यांच्या दयाळू स्वभाव आणि महत्त्वाकांक्षेसाठी सुपरिचित होता. त्यांच्या अचानक जाण्याने बेळगाव आणि गोवा या दोन्ही ठिकाणी त्यांच्या समवयस्कांमध्ये एक खोल पोकळी निर्माण झाली आहे.