बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे संशयित आत्महत्या प्रकरणातील फरारी आरोपींना मदत केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा अडचणीत आला असून पोलिसांनी प्रीतमसह 5 जणांना काल सोमवारी रात्री अटक केली आहे. या सर्वांना आज मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या पद्धतीने एका माजी मंत्र्याच्या मुलाच्या अटकेमुळे दोन्ही राज्यांत खळबळ उडाली आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्या माजी मंत्र्यांच्या मुलाचे नांव आहे. त्याच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय 60, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि राहुल दशरथ जाधव (वय 45, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींनी फरारी असलेल्या राजेंद्र व सुशील हगवणे यांना लपवण्याबरोबरच त्यांची राहण्याची सोय केली आणि आर्थिक मदत पुरवली, अशी माहिती तपासात समोर आली आहे. कर्नाटकातील एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणेसाठी करण्यात आलेले बुकिंग प्रीतम पाटील यांच्या नावावर असल्याचेही उघड झाले आहे. आरोपी हगवणे फरार असताना नेमक्या काय हालचाली झाल्या? कोणकोण सहभागी होते? याचा तपास पोलिस करीत आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र तुकाराम हगवणे हा गुन्हा घडल्यानंतर जवळपास सात दिवस फरारी होता. तथापी पोलिसांनी गेल्या 22 मे रोजी त्याला अटक केली. फरारी असताना त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहात पोलिस तपासापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने अनेक लॉज, फार्महाऊस, मित्रांची घरे, तसेच हटिल्समध्ये मुक्काम करत स्थानिक मदतीच्या आधारे ठिकाणे बदलली. पोलिस तपासात हा संपूर्ण प्रवास उघड झाला असून त्याला मदत करणाऱ्यांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
सून वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर राजेंद्र हगवणे आपल्या मुलाला घेऊन औंध येथील रुग्णालयात गेला. तेथून त्याचा प्रवास मुळशीमधील ‘मुहूर्त लॉन्स’ मार्गे वडगाव मावळकडे झाला. यानंतर त्याने पवना डॅम परिसरातील एका खासगी फार्महाऊसवर आश्रय घेतला. त्याठिकाणी त्याचा मुक्काम होता. यानंतर त्याने आळंदी येथील लॉजवर मुक्काम केला होता. ही सर्व ठिकाणे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात गर्दीपासून दूर असल्यामुळे त्याला पोलिस तपासापासून लपून राहण्यास मदत झाली. दरम्यान, 18 मे रोजी पुन्हा तो कार बदलून वडगाव मावळ भागात गेला. त्यानंतर एका बेळगाव (कर्नाटकमधील) नोंदणी असलेल्या गाडीतून त्याने प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. साताऱ्यातील पुसेगाव येथील 19 मे रोजी तो अमोल जाधव याच्या शेतावर गेला. त्यानंतर पसरणी मार्गे तो थेट कोगनोळीकडे रवाना झाला. ‘हॉटेल हेरिटेज’मध्ये ते दोन दिवस थांबले होते. या काळात तो सतत गाडी बदलत होता, तसेच मोबाइल बंद ठेवून संवाद टाळत होता. यामुळे पोलिसांना त्याचा मागोवा घेणे अवघड गेले. अखेर 22 मे रोजी तो पुण्यात परतत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून आरोपीच्या हालचालींसोबत त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तींच्या हालचाली पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर टिपल्या आहेत. सर्व लॉज, हॉटेल्स आणि फार्महाऊसची सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून, काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे कळते. या संपूर्ण पलायनात राजेंद्र हगवणे याला कोणत्या कोणत्या व्यक्तींची मदत मिळाली? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथक नियुक्त केले आहे. यामध्ये वाहन उपलब्ध करून देणारे, लॉज किंवा हॉटेल्समध्ये विना नोंदणी मुक्काम करू देणारे, आर्थिक मदत करणारे, तसेच मार्गदर्शन करणारे अशा चार ते पाच जणांची चौकशी सुरू आहे. काहींना समन्स बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, नुकत्याच अटक झालेल्या पाच जणांपैकी प्रीतम पाटील हा कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा असण्याबरोबरच बंडू लक्ष्मण फाटक हा महाराष्ट्रातील शिरोली चांदोली गावचा माजी सरपंच आणि मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळचा माजी ग्रा. पं. सदस्य असल्यामुळे आणखी कांही महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.