बेळगाव लाईव्ह :सांबरा येथील पूर्ण प्राथमिक मराठी सरकारी शाळेतील 1990-91 सालाच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुवंदन कार्यक्रम अपूर्व उत्साहात पार पडला. तब्बल 34 वर्षानंतर एक दिवसाची शाळा भरवण्यासाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक जुने प्रसंग कथन करत शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. प्राथमिक शाळेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते शिवाजी चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेपर्यंत प्रभारफेरी काढण्यात आली. ग्रामदैवत श्री दुर्गादेवी मंदिरात विद्यार्थीनींच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर शाळेत प्रवेश केलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.
शिक्षक, एसडीएमसी सदस्य यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वर्ग शिक्षक डोंगरे गुरुजी, रामदुर्ग टीचर, कांबळे सर, मुल्ला सर, जमखंडी टीचर, कागले टीचर, संतोष देसाई, महेश लोहार, येबू कोला, शबाना तासेवाले यांचे निधन झाल्याने मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

उपस्थित गुरुजनांचा भेटवस्तू, शाल, सन्मानचिन्ह आणि मानाचा फेटा बांधून सन्मान केला. एसडीएमसी सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय देत वर्गशिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यासक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच शाळेतील अनेक गोड आठवणी कथन केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करताना मिळवलेल्या यशात शाळा आणि शिक्षकांचे संस्कार असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्र आलेले विद्यार्थी विविध विषयांवरील गप्पात रंगून गेले होते.
मुख्याध्यापीका ए. ए. पाटील, शिक्षिका आर. बी. मगदूम, शिक्षक ए. बी. पागाद यांनी विचार मांडताना, मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज बनली आहे. आपल्या मुलांना आणि नातवंडाना मातृभाषेतून शिक्षणासाठी प्राधान्य देण्याची आवश्यक आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांचा सर्वागीण विकास होत असतो हे संशोधनातून स्पष्ट झाल्याची माहिती यावेळी दिली. तसेच सरकारी शाळेत सरकारच्यावतीने अनेक चांगले उपक्रम रबावण्यात येत आहेत, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
भुजंग चिंगळी, संजू गिरी, भागाण्णा इरोजी, सोमनाथ पालकर, मारुती बसरीकट्टी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन यल्लाप्पा हरजी, मोहन जाधव यांनी केले. बसवराज देसाई, हणमंत चिंगळी, बाळू सावंत, महादेव पाटील, आश्रफ मुल्ला, शशिकांत कोकितकर, प्रवीण देसाई, परशराम पालकर, नागो पालकर, प्रकाश देसाई, किरण धर्मोजी, सुभाष जाधव, लक्ष्मण ओसाप्पाचे, राजू देसाई, गुरुनाथ अष्टेकर, रघुनाथ कानुचे, शिवाजी चिंगळी, रेणुका धामणेकर, आशा डोंगरे, गीता जोगाणी, रेखा हरजी, जिजा कोकितकर, तुळसा जोगाणी, रंजना पाटील, लक्ष्मी लोहार, भारती हरजी, राजश्री पाटील, मालू जोई, नागुली जोई, अंजना जोगानी, सुलोचना बसरीकट्टी, नागुली जत्राटी, ज्योती धर्मोजी, प्रेमा कोकितकर, नंदा कांबळे, फातिमा तासेवाले, मलप्रभा गुरव, मालती गुरव, सुरेखा आप्पयाचे, रेखा जोगानी, रेणुका धर्मोजी, शांता गिरमल, पुष्पा लोहार, सुनीता कलखांबकर आदी माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या. एसडीएमसी अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्षा सुनीता जत्राटी, लक्ष्मण जोई, पूजा लोहार, सुधा गिरमल उपस्थित होते.