बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील हलशी गावात श्री महालक्ष्मी यात्रेपूर्वी वर्षभर आधी पारंपरिक रेडा सोडण्याचा विधी मंगळवारी होणार आहे. या पारंपरिक सोहळ्याची जय्यत तयारी हलशी व हलशीवाडी परिसरात सुरू झाली आहे.
हलशी (ता. खानापूर) येथे २०२६ साली होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर, पारंपरिक रेडा सोडण्याचा विधी मंगळवार, ६ मे २०२५ रोजी होणार आहे.
नेहमीप्रमाणे हा विधी यात्रेच्या एक वर्ष आधी केला जातो. मंगळवारी दुपारी १२ वाजता हलशी येथील महालक्ष्मी मंदिरासमोर हा सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी पौराणिक नृसिंह-वराह मंदिरात गाऱ्हाणे उतरविण्यात येईल. त्यानंतर रेड्याची मिरवणूक लक्ष्मी मंदिरापासून सुरू होईल.
या मिरवणुकीदरम्यान थळदेव, हलशीवाडी थडेदेव, म्हारताळ देव आदी देवतांना भेटी देण्यात येणार आहेत. त्यानंतर गावात घरोघरी रेड्याचे पूजन होईल. या संपूर्ण विधीच्या निमित्ताने २२ एप्रिलपासून मंगळवार आणि शुक्रवार या दोन वारांचे पालन करण्यात येत होते.
या आठवड्यातील पाचव्या मंगळवारी पारंपरिक रेडा सोडण्याचा विधी विशेष उत्साहात पार पडणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या कार्यक्रमाची घरोघरी जय्यत तयारी सुरु आहे. भंडाऱ्याच्या उधळणीने हलशी आणि हलशीवाडी हे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात फुलून जाणार असून, हजारो भाविक या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
