बेळगाव लाईव्ह :बेळगावची ऐतिहासिक वैभवशाली श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आज सायंकाळी पार पडणार असताना मिरवणूक मार्गाच्या ठिकाणचे कांही रस्ते जनतेकरिता शिवभक्तांच्या सोयीसाठी खुले ठेवण्याऐवजी लोखंडी बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आले असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी बॅरिकेड्सचा हा अडथळा तात्काळ दूर करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात धर्मवीर संभाजी चौक नजीकच्या केळकर बाग रस्त्याच्या ठिकाणी घालण्यात आलेले बॅरिकेड्स निदर्शनाला आणून देत बेळगाव लाईव्हशी बोलताना श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ महामंडळाचे सुनील जाधव सर्वप्रथम बेळगाववासियांना श्री शिवाजी जयंतीच्या शुभेच्छा देऊन म्हणाले की, बेळगाव शहरांमध्ये आज सायंकाळी वैभवशाली शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक पार पडणार आहे. तथापि खुद्द प्रशासनाच आवश्यक नसताना मिरवणूक मार्गाला जोडणारे कांही रस्ते बॅरिकेड्स टाकून अडवत मिरवणुकीला विशेष करून मिरवणुकीचा आनंद लुटण्यास येणाऱ्यासाठी अडथळा निर्माण करत आहे. प्रशासनाकडूनच शिवभक्तांची अडवणूक करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात असा प्रकार कधी घडला नव्हता. बेळगावची भव्य अशी पारंपारिक श्री शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी आज सायंकाळी शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास दोन अडीच लाख जनता रस्त्यावर उतरणार आहे. त्यांना या बॅरिकेड्सचा त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासनाने संवेदनशील भागातील रस्ते बंद करण्याऐवजी मिरवणूक मार्गाजवळील रस्ते बंद करण्याचा हा प्रकार चुकीचा आहे. रहदारी नियंत्रणाच्या नावाखाली श्री शिवजयंती मिरवणुकीला लाखोच्या संख्येने असणारी शिवभक्तांची संख्या रोडावावी, मिरवणुकीची गर्दी कमी व्हावी यासाठी हा सर्व खटाटोप चालला आहे. मात्र हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. मात्र प्रशासनाने लक्षात ठेवावे की लाखोच्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांना ते या पद्धतीने अडवू शकणार नाहीत असे सांगून कोणत्याही परिस्थितीत आम्ही अपूर्व उत्साहात शांततेने आजची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पार पाडू, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, संबंधित बॅरिकेड्सचा जास्त त्रास झाल्यास मिरवणुकीसाठी येणारे शिवभक्त स्वतःच रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स हटवतील हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. गेल्या 25 वर्षात श्री शिवजयंती मिरवणुकीसाठी अशा प्रकारे कधीही बॅरिकेड्स घालण्यात आले नव्हते. प्रशासनाची काहीतरी नामुष्की असावी किंवा बंदोबस्ताची आखणी करण्यात काहीतरी कमतरता राहिली असावी आणि ते अपयश लपवण्यासाठी हे बॅरिकेड्स घालण्यात आले असावेत. कारण काहीही असो आमची एकच मागणी आहे की मिरवणूक मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर घालण्यात आलेले बॅरिकेड्स आज सायंकाळी मिरवणूक सुरू होण्यापूर्वी तात्काळ हटवण्यात यावेत. अन्यथा ते काम शिवभक्तच करून टाकतील, असे सुनील जाधव यांनी शेवटी सांगितले.