बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या कामकाजावर महापौर मंगेश पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे आणि कर वसुलीत होत असलेल्या दिरंगाईबाबत त्यांनी अधिकार्यांना फटकारले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागाची बैठक महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मागील कार्यवाहीचे वाचन झाले. त्यानंतर सदस्यांनी महसूल विभागाच्या अकार्यक्षमता आणि नागरिकांना वेळेवर व योग्य माहिती न मिळण्यावर ताशेरे ओढले. काही नगरसेवकांनी कार्यालयात जाताना कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीचाही मुद्दा मांडला.
महापौर मंगेश पवार यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत स्पष्ट सांगितले की, महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी चुकीची माहिती देऊन नागरिकांना गोंधळात टाकणे थांबवले पाहिजे. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होते. त्याचबरोबर कोणतीही समस्या असल्यास ती वरिष्ठांकडे सादर करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. नगरसेवक जाधव यांनी एका खाजगी शाळेच्या मालमत्ता करात ४ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्या वाढीबाबत कार्यालयीन पातळीवर टाळाटाळ सुरू असून दोन वर्षांचा कर थकीत असल्याचे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर महापौरांनी महसूल संकलन प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याचे आदेश दिले. नागरिकांना भु-भाडे संदर्भातील चलन थेट क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्यात यावे, अशी सूचना दिली. लीज व्यवहार, कर भरणा, मालमत्ता दुरुस्ती आदी मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी ठोस पावले उचलण्याचे ठरले असून, अधिकार्यांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली नाही, तर कारवाईचा इशाराही महापौरांनी दिला.
या बैठकीत उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी, विरोधी पक्षनेते मुजम्मिल ढोणी नगरसेवक रवी साळुंखे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.