बेळगाव लाईव्ह : संतीबस्तवाड येथे आठवड्याभरापूर्वी घडलेल्या धर्मग्रंथ विटंबना प्रकरणातील दोषींना अटक करण्याऐवजी, गावातील निष्पाप हिंदू युवकांना लक्ष्य करून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. दोषींवर तातडीने कारवाई करण्याची आणि पोलिसांचा छळ थांबवण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
१२ मे २०२५ रोजी संतीबस्तवाड येथील मशिदीतील धर्मग्रंथ चोरून जाळल्याची निंद्य घटना उघडकीस आली होती. यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि दोषींना कठोर शासन करण्याची मागणी करत आंदोलने छेडण्यात आली होती. बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनीही दोषींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, घटनेला आठवडा उलटूनही पोलीस प्रशासन कुराणची विटंबना करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी ठरले आहे.
गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी पोलीस गावातील युवकांची धरपकड करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही कारवाई करताना कायद्याचे उल्लंघन होत असून, अटक केलेल्या निर्दोष युवकांना २४ तासांत सोडण्याऐवजी त्यांना चार ते पाच दिवस डांबून ठेवले जात आहे. त्याचप्रमाणे, न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी त्यांचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात नमूद आहे. पोलिसांच्या या धरपकडीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून लोकांना आपल्या मुलांची चिंता सतावत आहे.
तपासाच्या नावाखाली पोलिसांकडून गावातील निर्दोष हिंदू युवकांना लक्ष्य करण्याच्या कृतीचा निषेध करत, संतप्त संतीबस्तवाड ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मिळण्याची मागणी करत सादर केलेल्या निवेदनात पोलिसांच्या मनमानी कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. धर्मग्रंथ जाळण्याच्या प्रकरणात गावातील हिंदू युवकांना निष्कारण गोवले जात असून, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मुस्लिम समाजातीलच विघ्नसंतोषी लोकांनी तो निंद्य प्रकार केला नसेल कशावरून? पहाटे मशिदीतून ‘बाग’ दिली जाते, त्यावेळी धर्मग्रंथ चोरीचा आणि विटंबनेचा प्रकार उघडकीस न येता, तो सकाळी १० वाजता उघडकीस येतो, हे कसे काय शक्य आहे? धर्मग्रंथ विटंबनेच्या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी, ११ मे रोजी संतीबस्तवाड मशिदीचे मौलाना अचानक आपल्या गावी का निघून गेले? समाजकंटकांनी रात्री धर्मग्रंथ जाळला असेल तर त्यादिवशी सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत तो अर्धवट अवस्थेत का धुमसत जळत होता? नेमके धर्मग्रंथ विटंबनेच्या घटनेवेळी मशीद व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय बंद होते? धर्मग्रंथ नसताना मुस्लिम बांधवांची मशिदीमध्ये पहाटेची प्रार्थना कशी काय पार पडली? त्यावेळी धर्मग्रंथ गायब असल्याचे निदर्शनास आले नाही का? धर्मग्रंथ विटंबनेची घटना घडल्यानंतर गावातील मुस्लिम बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालय आणि गावातील नेतेमंडळींना त्याची माहिती देण्याऐवजी, परगावातील लोकांना त्याची माहिती देण्याद्वारे सुमारे दोन हजार लोकांना गोळा करून मोर्चा का काढला? असे सवाल उपस्थित आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या संतीबस्तवाड ग्रामस्थांनी आणि महिलांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी एका महिलेने सांगितले, कि “माझ्या मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण चौकशी करून २४ तासांत त्याला सोडण्याऐवजी, तब्बल सहा दिवस तुरुंगात डांबून ठेवले. त्याला अन्नपाणीही दिले नाही आणि मारहाणीमुळे त्याच्या शरीरातील हाडे खिळखिळी झाली आहेत. माझ्या दुसऱ्या मुलालाही अटक करण्याची धमकी दिली जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे!”
एका ग्रामस्थाने सांगितले, “कुराण विटंबना प्रकरणी आमच्या गावातील हिंदू युवकांना पोलीस जाणूनबुजून लक्ष्य करत आहेत. समान न्याय, समान कायद्यानुसार त्या समाजातील लोकांची देखील चौकशी झाली पाहिजे. धर्मग्रंथ जाळून संतीबस्तवाड गावातील हिंदू समाज बांधवांवर अन्याय करण्याचे हे षडयंत्र आहे. ज्या दिवशी विटंबनाची घटना घडली, त्यावेळी ग्रामपंचायत आणि गावातील प्रमुख नागरिकांना माहिती देण्याऐवजी, परगावच्या लोकांना गावात बोलावून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. हिंदूंची घरे पेटवून देण्याची भाषा केली जात होती, परिणामी जीवाच्या भीतीने त्यावेळी काही कुटुंबांवर गाव सोडून पळून जाण्याची वेळ आली होती. त्यानंतर आता पोलीस आमच्या मुलांना पकडून ५-६ दिवस तुरुंगात डांबून त्यांचे हाल करत आहेत. हे सर्व थांबवून आम्हाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो आहोत.”
या सर्व शंका लक्षात घेता हिंदू समाजाच्या लोकांनी हे निंद्य कृत्य करणे शक्य नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व शंकांवर गांभीर्याने विचार करून हिंदू लोकांवर होणारा अन्याय थांबवावा आणि संतीबस्तवाड गावातील शांती, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
एकंदर सर्व प्रकरण लक्षात घेता या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून पुढे काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


