बेळगाव लाईव्ह : महिला दिनाच्या निमित्ताने आज ‘बेळगाव लाईव्ह’ने बेळगावच्या यशस्वी आणि प्रेरणादायी डॉक्टर उज्वला हलगेकर यांच्याशी संवाद साधला. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या समाजात एक आदर्श बनल्या आहेत. बेळगाव शहराच्या दक्षिण भागात, हट्टीहोळी गल्ली, शहापूर येथे ‘माई हॉस्पिटल’ या नावाने आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टर सौ. उज्वला मिलिंद हलगेकर यांचे कार्य कौतुकास्पद आहे. एमबीबीएस आणि एमडी पदवी मिळवून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव मोठ्या मेहनतीने कमावले आहे.
डॉ. उज्वला हलगेकर यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षण कोरे गल्ली, शहापूर येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक ६ मध्ये, माध्यमिक शिक्षण बालिका आदर्श विद्यालयात, पदवीपूर्व शिक्षण जीएसएस महाविद्यालयात, तर वैद्यकीय शिक्षण मिरज येथील सरकारी महाविद्यालयात त्यांनी पूर्ण केले. मराठी माध्यमातून शिक्षण घेत, आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे.
आजवर त्यांनी असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्या रुग्णांसाठी एक विश्वासार्ह आधार बनल्या आहेत. त्यांचे पती, डॉ. मिलिंद हलगेकर हे बालरोगतज्ज्ञ असून, दोघेही वैद्यकीय क्षेत्रात समर्पित सेवा देत आहेत. मूळच्या हिंदवाडीच्या असलेल्या डॉ. उज्वला हलगेकर सध्या वडगाव येथे स्थायिक आहेत. “बेळगावची मुलगी आणि बेळगावचीच सून” अशी ओळख असलेल्या डॉक्टर उज्वला हलगेकर या महिलांसाठी एक प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. आरोग्यसेवेत त्यांनी दिलेले योगदान आणि समाजातील त्यांची भूमिका यामुळे त्या एक आदर्श चिकित्सक म्हणून ओळखल्या जातात. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या या कार्याचा गौरव केला जात असून ‘हल्लीच्या काळातील महिलांसमोरील आव्हाने आणि उपाय’ यावर समस्त महिलावर्गाला त्यांनी मोलाचे सल्ले दिले आहेत.
१) प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत, नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला कोणत्या पद्धतीने काम करतात? आणि कशा पद्धतीने काम केले पाहिजे?
– देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता नोकरी शोधण्याच्या मागे पाळण्यापेक्षा स्वावलंबी होऊन स्वयंरोजगार निर्मितीकडे भर दिला पाहिजे. स्वतःच्या प्रगतीसाठी योग्य प्रशिक्षण घेऊन आर्थिक सक्षम होण्यावर भर दिला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया भक्कमपणे कार्यरत आहेत. प्लम्बिंग, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हिंग यासारख्या अनेक क्षेत्रात स्त्रिया जशा काम करत आहेत त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी भक्कम व्हावे.
२) चंगळवादी संस्कृती मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. या संस्कृतीला फाटा देण्यासाठी महिलांचा वाटा काय?
-आपल्या भारतीय संस्कृतीला पुरातन परंपरा आहे. सनातनी परंपरेच्या भारतात अनेकविध संस्कृती नटलेल्या आहेत. मात्र अलीकडचा चंगळवाद लक्षात घेता शालेय पातळीपासूनच महाभारत, रामायण, भगवद्गीतेचे अध्ययन घेणे महत्वाचे आहे. आपल्या संस्कृतीचा ठसा बालवयातच मुलांच्या मनावर उमटवणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर आपली संस्कृती आपणही आचरणात आणायला हवी. आपल्या संस्कृतीचे जतन करायचे असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे.
३) पूर्वी अनेक पदार्थ, सणावाराच्या निमित्ताने महिला घरीच करत. मात्र अलीकडच्या काळात हॉटेल, खाणावळींची वाढलेली संख्या आणि तेथील गर्दी पाहता महिलांच्या पाककलेत कमतरता जाणवत आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. याबद्दल तुमचे मत काय?
– आजच्या काळात प्रत्येक स्त्री कामानिमित्त घराबाहेर पडत आहे. याचा ताण घरातील कामावर पडलेला दिसून येत आहे. यामुळे हॉटेल, खानावळी आणि बाहेरच्या खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ झालेली आहे. स्वयंपाक घर आणि घरगुती कामे हि केवळ स्त्रीनेच करावीत हा अट्टहास प्रत्येकाने सोडून घरची जबाबदारी प्रत्येकाने वाटून घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
४) शिक्षणाच्या नवनवीन वाटा उपलब्ध झालेल्या आहेत. शहर असो किंवा ग्रामीण भाग.. शिक्षणक्षेत्र विस्तारलेले असूनही व्यावसायिक दृष्टिकोनातून महिलांचे प्रयत्न कमी दिसून येत आहेत, याबद्दल तुमचे मत काय?
– शिक्षण क्षेत्र, शिक्षण पद्धती यात कालानुरूप बदल होणे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंरोजगारावर आधारित, व्यावसायाभिमुख प्रशिक्षण पद्धती अशा पद्धतीचे शिक्षण पुरविणे हि काळाची गरज बनली आहे. याची सुरुवात शालेय पातळीपासूनच करणे अत्यावश्यक आहे. केवळ पुस्तकी ज्ञानाने काहीच सिद्ध होणार नाही. यासाठी वास्तवाचे भान ठेवून शिक्षण पद्धती सुधारणे मुलांना ‘प्रॅक्टिकल’ ज्ञानाचे धडे देणे गरजेचे आहे.