बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या बीम्स हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजवर लोकायुक्त पोलिसांनी अचानक धाड टाकली असून, या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. औषध खरेदीतील अपव्यय, डॉक्टरांची कर्तव्यातील कसूर यासारख्या गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी बेळगावचे लोकायुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने बीम्स हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजवर अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान सुमारे २० अधिकाऱ्यांचा चमू सक्रिय होता आणि विविध विभागांमध्ये चौकशी केली जात आहे.
विशेष म्हणजे, बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्या चेंबरचीही झडती घेण्यात आली असून, महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून त्यांची तपासणी केली जात आहे. बीम्स हॉस्पिटलमध्ये औषध खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी होत्या. तसेच, काही डॉक्टरांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार न पाडल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर लोकायुक्तांनी त्वरित चौकशीस सुरुवात केली आहे.
बीम्स हॉस्पिटलमधील अनेक विभागांत सध्या मूलभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रकल्प रखडला आहे. यासंबंधीही तपास केला जात आहे. ही धाड पडताच बीम्स प्रशासन, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या कारवाईची शहरभर चर्चा सुरू आहे.