बेळगाव लाईव्ह :रिसस्टेनेबिलिटी कंपनीकडून देखभाल करण्यात येत असलेल्या बेळगाव महापालिकेच्या तुरमुरी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी आता ‘बॅलेस्टिक सेपरेटर’ मशीनचा वापर सुरू करण्यात आला आहे. यासाठी रिस्टेनेबिलिटी कंपनीने 1 कोटी रुपयांच्या दोन मशीन्स खरेदी केल्या आहेत.
तुरमुरी कचरा प्रकल्पात वर्गीकरण न झालेला सुमारे 30 हजार टन कचरा आहे. त्या कचऱ्याचे वर्गीकरण या नव्या मशीनच्या माध्यमातून केले जात आहे. याखेरीज शहरातून दररोज 54 ते 55 टन मिश्र कचरा प्रकल्पाकडे येत असतो. त्या कचऱ्याचे वर्गीकरणही बॅलेस्टिक सेपरेटर मशीनच्या सहाय्याने केले जाणार आहे.
बेळगाव शहरातच कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे दररोज 45 टन सुका कचरा आणि 84 टन ओला कचरा स्वतंत्रपणे तुरमुरी कचरा डेपो येथे जात आहे. यामुळे बेळगाव महापालिकेची दरमहा सुमारे 10 लाख रुपयांची बचत तर होतच आहे, शिवाय रिसस्टेनेबिलिटी कंपनीने देखील 100 टक्के कचरा वर्गीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
आता बॅलेस्टिक सेपरेटर मशीनमुळे मिश्र कचऱ्याचेही वर्गीकरण होणार आहे. सदर दोन्ही मशीन्स गेल्या 12 फेब्रुवारी रोजी तुरमुरे येथील प्रकल्पात आल्या आहेत.
रिसस्टेनेबिलिटी कंपनीकडून या मशीनद्वारे ओल्या कचऱ्यावर थेट प्रक्रिया करून कंपोस्ट खताची निर्मिती केली जात आहे. कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या दोन मशीनची किंमत 1 कोटी रुपये असून याशिवाय या मशीनची अन्य उपकरणे व आवश्यक मूलभूत सुविधांसाठी 2 कोटी खर्च करण्यात आले आहेत. या पद्धतीने तुरमुरी तेथील प्रकल्पातील कचरा वर्गीकरण करण्यासाठी रिसस्टेनेबिलिटी कंपनीने 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.