बेळगाव लाईव्ह :बेळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी आज सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन युवतीशी असभ्यवर्तन केल्याबद्दल ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद झालेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस चालकाची विचारपूस करून धीर दिला. यामुळे नागरिकात सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठी भाषिक युवतीला कन्नड येत नसेल तर कर्नाटकात का राहतेस? अशी असभ्य विचार ना करून तिला शिवीगाळ करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागातील बसवाहक महादेव हुक्केरी याला इतर प्रवाशांनी फैलावर घेऊन जाब विचारल्याची घटना गेल्या शुक्रवारी बाळेकुंद्री खुर्द बस थांब्याच्या ठिकाणी घडली होती. त्यावेळी संतप्त प्रवाशांनी केलेल्या धक्काबुकीत जखमी झालेला बस वाहक महादेव हुक्केरी याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
संबंधित युवतीने केलेल्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध मारीहाळ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा देखील नोंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी बेळगाव बागलकोट दौऱ्यावर आलेले राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन महादेव याची भेट घेऊन विचारपूस केली.
पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झालेल्या एका आरोपीची या पद्धतीने मंत्री महोदयांनी जातीने भेट घेऊन चौकशी केल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी बस वाहकाची प्रकृती सुधारली असून त्याला लवकरच घरी पाठवले जाईल. आमचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर अधिकारी हॉस्पिटलला दररोज भेट देऊन त्याची काळजी घेत आहेत.
महादेव तंदुरुस्त झाला असला तरी घडल्या घटनेनंतर त्याच्यावर नोंदवण्यात आलेला पोस्को गुन्ह्यामुळे तो बेचैन झाला आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला धीर दिला असून त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार करण्यात आली आहे, असे सांगितले.