बेळगाव लाईव्ह: युवा समिती सीमा भाग संघटनेच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन सीमा भागात चाललेल्या सध्याच्या घडामोडी बाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिति सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके आणि सहकाऱ्यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली.
बाळेकुंद्री येथे अल्पवयीन मुलीला केलेल्या शिवीगाळ प्रकरणाला भाषिक रंग देऊन सीमाभागात वातावरण खराब करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या दबावाखाली येऊन उलट आममच्यावरच खोटे गुन्हे घातले जात आहेत. त्या संघटनांचा म्होरक्या बेंगलोर वरून बेळगावला येऊन इथल्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांना तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्रातल्या पक्ष-संघटनांना आवाहन देण्याचं काम करत आहे.
तश्याना पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देत गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींची कल्पना देण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी शिष्ट मंडळाशी बोलताना विषयी बोलताना कर्नाटक सरकार सोबत मी स्वतः बोलेन अशी ग्वाही दिली तर मराठी माणसाला त्रास देणं थांबलं नाही तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः बेळगावला येऊन त्यांना उत्तर देईन असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिष्टमंडळात शुभम शेळके यांच्यासह प्रवीण रेडेकर, किरण मोदगेकर, अशोक घगवे, सुरज कनबरकर उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या प्रमुख नेत्यांना भेटून नेमकं कोणत्या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले त्याचा तपशील
विषय :- कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून सीमावासीयांवर होणारे भाषिक अत्याचार व दाखल होणारे विविध खोटे गुन्हे यावर लक्ष केंद्रित करणे बाबत.
महोदय,
वरील विषयास अनुसरून बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे गुन्हे दाखल केले जातात, काही तथाकथित कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडत मराठी भाषिकांत एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक सुरू असून कुठेना कुठे सीमालढ्यात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या एका घटनेमध्ये कर्नाटक परिवहनची एक बस मारिहाळ बेळगाव येथून येत असताना एक युवक व अल्पवयीन युवती तिकीट घेत असताना त्या बसचा वाहक (कंडक्टर) महादेवप्पा याने युवतीची छेड काढली व तिचा विनयभंग केला असता त्या युवकाने व युवतीने मराठीत उत्तर दिले असा मुद्दा करत महादेवप्पाने आपला गुन्हा लपविण्यासाठी कन्नड आणि मराठी असा भाषिक वाद निर्माण करण्याच कांगावा केला, त्यामुळे युवतीने बाळेकुंद्री येथील आपल्या घरी हा प्रकार सांगितल्याने तेथील मराठी, कन्नड, उर्दू भाषिकांनी रागाच्या भरात वाहकाला मारहाण केली, या मारहाणीचे आम्ही कुठल्याही प्रकारचे आम्ही समर्थन केले नाही आणि करणारही नाही, पण पोलीस प्रशासनाच्या चौकशी अंती आपण केलेले दुष्कृत्य लपविण्यासाठी त्या वाहक (कंडक्टर) ने त्याला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले म्हणून पोलीस प्रशासनाने त्याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
पण एवढ्या गंभीर गुन्ह्यातही कन्नड संघटनांनीही आपलीच री ओढत याला भाषिक रंग देत महाराष्ट्रातील बसच्या वाहकाला काळे फासले, त्यावर सीमाभागात विविध प्रतिक्रिया उमटल्या, त्या बरोबर आम्हीही समाज माध्यमातून प्रतिक्रिया देत दोन्ही राज्यामध्ये वाद किंवा भाषिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रतिक्रिया दिली, कंडक्टरने केलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य विसरून आम्हा मराठी भाषिक गुन्हे दाखल करण्यात येत असून हा एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार येथील प्रशासन करत आहे, त्याच बरोबर ज्या अल्पवयीन युवतीसोबत हा गंभीर प्रकार घडला तिच्या आई वडिलांना पोलीस स्थानकात बोलावून गुन्हा मागे घेण्यास दबाव आणण्यात येत आहे.
तसेच डिसेंबर २०२२ मध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी सीमाभागात शांतता राहावी म्हणून दोन्ही म्हणजेच महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या तीन तीन समन्वक मंत्र्यांची समिती नेमली होती, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही किंबहुना त्या समितीची एकही बैठक झाली नाही व कुठली ठोस कार्यवाही ही झाली नाही, त्यामुळे येथील भाषिक अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत.
तसेच संपूर्ण हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलही कर्नाटकातील विविध लाल पिवळ्या रंगाचा आयडी वरून बदनामी केली जाते, व शिवरायांच्या बद्दल घाणेरड्या प्रकारच्या कमेंट केल्या जातात, यावर तक्रार करूनही कर्नाटकी सरकार व प्रशासन कोणतीच कारवाई करीत नाही, उलट त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय आणि त्यातूनच ह्या विकृत वृत्तीच्या संघटना फोफावत चाललेल्या आहेत, त्यासाठी आपण महाराष्ट्रातून समाज माध्यमावरील आशा पेजवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत.
तरी या सर्व प्रकारात आपण लक्ष घालून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती.