बेळगाव लाईव्ह : बेळगावसह हुक्केरी, खानापूर, गोकाक परिसरात कामासाठी आलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप व इनरव्हील क्लबतर्फे मदतीचा हात देण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंसह शिक्षण साहित्याचेही वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अनेक गरीब ऊसतोड कामगार दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांच्या हंगामात कामासाठी येतात. याच पार्श्वभूमीवर, ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप आणि इनरव्हील क्लबच्या वतीने मनगुत्ती व हत्तरगी भागात ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत ऊसतोड मजुरांना रेशन किट, महिलांसाठी साड्या, पुरुषांसाठी कपडे, तसेच लहान बालकांसाठी कपडे, खाऊ व बिस्किटे वितरित करण्यात आली. याशिवाय, महावीर स्कूलच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या एक्साम पॅडचे वाटप करण्यात आले.
ॲटोनगरच्या आंबेडकर कॉलनीत राहणाऱ्या आणि गेल्या ७-८ वर्षांपासून आजारी असलेल्या एका व्यक्तीसाठी विशेष मदत करण्यात आली. त्यांना झोपण्यासाठी एअर बेड, रेशन किट, शाल आणि कपड्यांची मदत देण्यात आली.
या उपक्रमात मेधा शहा, प्रियांका शहा, तेजस्विनी हजारे, राहुल पाटील, सुधीर चौगुले, अनिल चौगुले, सागर गुतगी, नौशाद आणि उत्तम मगदूम यांनी विशेष सहभाग घेतला.
दरवर्षी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या वतीने बेळगाव, हुक्केरी, खानापूर, गोकाक तालुक्यातील ऊसतोड मजुरांना आवश्यक मदत केली जाते. महिलांना साड्या, पुरुषांचे कपडे, लहान बालकांसाठी कपडे, शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, कंपास बॉक्स तसेच खेळण्यांचे साहित्य दिले जाते.
स्त्रियांसाठी आरोग्य पेटी व प्रथमोपचार बॉक्सदेखील पुरविण्यात येतात. ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप ऊसतोड कामगार कुटुंबीयांच्या जीवनमान सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.