बेळगाव लाईव्ह :सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घेणे गरजेचे आहे. निर्णायक लढा देण्याची ही वेळ असून यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ठामपणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी आहे. तेंव्हा महाराष्ट्र सरकारचे येत्या उन्हाळ्यातील आगामी अधिवेशन लक्षात घेऊन सीमाप्रश्नी या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘चलो मुंबई’ या धडक मोहिमेची हाक द्यावी, असे आवाहन करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उबाठा शिवसेना समितीला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे ठाम आश्वासन कोल्हापूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय देवणे यांनी दिले.
शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने आज शनिवारी सकाळी सम्राट अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली येथे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या शिवसैनिकांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. आपल्या भाषणात देवणे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील 67 हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी सीमा प्रश्नाच्या सत्वर सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावयास हवा असे मत व्यक्त केले आहे.
त्यांच्या या मताशी मी देखील सहमत आहे. आजपर्यंत सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नसंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय तो आपला निर्णय असे मानण्यात आली आहे आणि यापुढे देखील मानत राहील. सीमाप्रश्नाची लढाई सुरूच राहणार असून या लढाईला बळ देण्याचे काम महाराष्ट्र कायम करत राहील. मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक सैनिक म्हणून तुमच्यासोबत कार्यरत राहीन. माझ्यामते सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने विद्यमान महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून आपण कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे मार्गे मुंबईला धडक मोर्चा काढला पाहिजे. आता योगायोगाने महाराष्ट्रातील नव्या सरकारचे एक अधिवेशन झाले आहे. आता दुसरे अधिवेशन येत्या उन्हाळ्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘चलो मुंबई’ मोहिमेची हाक द्यावी. तसे केल्यास कागल, कोल्हापूरपासून मुंबईपर्यंतची या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना घेईल. या धडक मोहिमेमध्ये आपण सर्व पक्षांना सामील करून घेऊ. मात्र सर्वप्रथम महाराष्ट्र एकीकरण समितीने या धडक मोहिमेचा निर्णय घ्यावयास हवा. किमान 100 लोकांची रॅली अर्थात मोर्चा बेळगावपासून मुंबईच्या दिशेने निघाली पाहिजे. मुंबईपर्यंतच्या प्रवासादरम्यान मधे लागणाऱ्या कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकी बाबत निवेदन सादर केले जावे. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सहभागी असतील. त्याचप्रमाणे अन्य पक्षांनाही आम्ही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहोत. कारण हा लढा मराठी माणसाचा असल्यामुळे त्यात आम्ही पक्षभेद करणार नाही.
मुंबई येथे रॅली अर्थात मोर्चाने जाऊन आपण त्या ठिकाणी एक दोन तासाचे आंदोलन करू. त्याप्रसंगी आपण उद्धवजी ठाकरे यांच्यासह माननीय शरदचंद्रजी पवार व अन्य मातब्बर नेतेमंडळींना आमंत्रित केले जाईल. थोडक्यात महाराष्ट्र सरकारच्या आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये सीमाप्रश्नाच्या सोडवणुकी संदर्भात आवाज घुमला पाहिजे आणि त्या पद्धतीने नियोजन नियोजन झाले पाहिजे. तथापि यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अंतिम निर्णय घ्यावयास हवा. त्यांनी फक्त निर्णय घ्यावा त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथे कोणती व्यवस्था करायची याची सर्व जबाबदारी माझ्यावर असेल त्यासाठीचा जो आर्थिक खर्च येणार आहे तो देखील मी उचलण्यास तयार आहे असे असे स्पष्ट करताना मात्र यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून चांगला प्रतिसाद मिळावयास हवा आणि यासाठी समितीने सत्वर आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करून योग्य तो निर्णय घ्यावा असे विजय देवणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. दुसरे म्हणजे कर्नाटकात सीमा भागामध्ये मराठी जनतेवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने दोन्ही राज्याच्या गृहमंत्र्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेवर खोटे गुन्हे दाखल केले जाऊ नयेत, त्यांच्यावर कन्नड सक्ती केली जाऊ नये, हे मुंबईला धडक मोर्चा काढण्याचे आपले दोन उद्देश असतील असे पुढे सांगून यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे. हा झाला पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यात आपण ‘चलो दिल्ली’चा नारा दिला पाहिजे. सध्या संसदेत शिवसेनेचे नव खासदार आहे. सीमाप्रश्नसंदर्भात त्यांना सहकार्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देखील आहेत. या 15 खासदारांची मोट बांधण्याबरोबरच मी स्वतः छत्रपती शाहू महाराजांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या लेटरपॅडवर 48 खासदारांना नवी दिल्लीच्या बोट क्लब येथील आमच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे या सर्व भविष्यातील गोष्टी झाल्या मात्र याबाबतीत सर्वप्रथम महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम निर्णय घेऊन तो जाहीर करणे आवश्यक आहे असे विजय देवणे यांनी स्पष्ट केले.
सम्राट अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली येथे आयोजित संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद शिवसैनिकांच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर शिवसेनेचे नेते अरविंद नागनूरी, समितीचे युवा नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, नेताजी जाधव आदींनी समायोचीत विचार व्यक्त केले. कार्यक्रमास बेळगाव शिवसेनेचे (सीमाभाग) नेते प्रकाश शिरोळकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजीत चव्हाण -पाटील आदींसह समिती व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित.