Tuesday, February 25, 2025

/

स्मशानातील महाशिवरात्र…. मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचा आगळावेगळा उपक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह  – हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे आगळे महत्त्व आहे. संपूर्ण देशभरातच महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते.मात्र एखादा स्मशानात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी केली जात असल्यास ते एक निश्चितच आश्चर्य समजायला हवे.

गेल्या 25 वर्षांपासून शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत, मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी सुधारणा कार्या बरोबरच महाशिवरात्र सोहळा साजरा केला जातो. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत आयोजित केला जाणारा महाशिवरात्र सोहळा बेळगावकरांसाठी आणि समस्त शिवभक्तांसाठी नेहमीच एकच औत्सुक्याचा विषय बनलेला असतो. यावर्षीही सालाबादाप्रमाणे मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने उद्या बुधवारी दिनांक २६ फेब्रुवारी रोजी मुक्तिधाम महाशिवरात्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वास्तविक बहुसंख्य जण अंत्यविधीसाठीच स्मशानात पाय ठेवतात. मुद्दामहून स्मशानात जाणे शक्यतो टाळले जाते.परंतु बेळगावातील शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी याला अपवाद ठरले आहे. या भागातील निवडक सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी स्मशान स्मशानभूमी सुधारण्याचे काम हाती घेतले.

हेच कार्य समस्त बेळगावातील नागरिकांसाठी आदर्शवत ठरले. मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या सेवाभावी कार्यातूनच बेळगाव आणि परिसरातील स्मशानभूमी सुधारण्याच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ओसाड अश्या शहापूर स्मशानभूमी परिसराला नंदनवन बनविण्याचे काम मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेली चोवीस वर्ष अखंडितपणे विविध सेवाभावी उपक्रम पार पाडले आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातूनच ओसाड स्मशानभूमीचे रूपांतर नंदनवन स्वरूपात झाले आहे.

स्मशानभूमी परिसरात स्वच्छता राखली जावी या हेतूने शिव मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून या स्मशानभूमीत महाशिवरात्र उत्सव सोहळा साजरा केला जातो. स्मशानभूमीतील शिवमंदिरात नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळी पूजाअर्चा करण्यात येते.मंदिरात पूजेला व दर्शनासाठी परिसरातील नागरिक महिला व अन्य भाविक सोवळे न पाळता बिनधास्तपणे उपस्थित राहतात. हेच मुक्तिधाम शिवमंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.

Shahapur smashsn
उत्तर कर्नाटकातील सर्व स्मशानभूमींना सुधारणेची वाट दाखवणाऱ्या शहापूर मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचा या वर्षी महाशिवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्त आज मध्यरात्री आणि उद्या शनिवारी पहाटे शिव मंदिरात अभिषेक,महापूजा,आरती,प्रसाद वाटप आणि शहापूर भारतनगर येथील श्री भक्ती महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कोरोना काळापासून मंडळांनी महाप्रसादाचा कार्यक्रम बंद केला आहे मात्र प्रसाद वाटप केले जाते यावर्षीही महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना उपवास फराळ वाटप केला जाणार आहे.

मंडळाच्या वतीने गेल्या चोवीस वर्षांत मुक्तिधाम स्मशानभूमीत विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने अनेक सामाजिक उपक्रम पार पाडण्यात आले आहेत. गरीब कुटुंबातील मृतांवर वर मंडळाने स्व-खर्चाने अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यसंस्कार योग्यप्रकारे व्हावेत या दृष्टीने अंत्यदाहीन्या उभारण्यात आले आहेत. अंत्यसंस्काराची सोय त्याचबरोबर माफक दरात लाकडाचे व्यवस्था यामुळे अंत्यसंस्काराचा खर्चही कमी होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर अलीकडेच महानगरपालिकेच्या वतीने शेणी गौवर्यांवर मोफत अंत्यसंस्काराची ही व्यवस्था करण्यात आली आहे. स्मशानभूमी परिसरात जाएन्ट्स च्या मदतीने स्वच्छताग्रु बांधण्यात आले आहे.तात्कालिन नगरसेविका अश्विनी जांगळे यांच्या प्रयत्नातून पाण्याची टाकी व नळ व्यवस्था करण्यात आली आहे. राजस्थानी युवक मंडळाच्यावतीने पेव्हर ब्लॉक्स, बसण्यासाठी निवार्‍याची सोय करण्यात आली आहे. स्मशानभूमीत एखादा उपक्रम अथवा विकास कामे हाती घेताना आर्थिक मदत गोळा करण्याऐवजी देणगीदारांना नियोजित प्रकल्पाची माहिती देऊन साहित्य रुपात सहकार्य करण्याकडेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भर दिला आहे.

मंडळाने महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद कार्यक्रमात गरिबांचे विवाह स्वखर्चाने करून दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन,गेल्या चार वर्षांपासून महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. महाप्रसादा ऐवजी उद्या प्रसाद वाटप केले जाणार आहे.
गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने करण्यात येत आहे.बेळगाव महापालिकेचे अपेक्षित सहकार्य नसतानाही मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने केवळ सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शहापूर स्मशानभूमीच्या सुधारण्यासाठी चालविलेले कार्य उल्लेखनीय आहे. स्मशानभूमी बद्दलचे नागरिकांमधील मानसिकता बदलण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेवाभावी कार्याने केला आहे. मंडळाच्या कार्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दर्शवला आहे. शहर परिसरातील व इतर स्मशानभूमीना हे सामाजिक कार्य निश्चितच अनुकरणीय आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.