बेळगाव लाईव्ह: युवतीवरील अन्यायाबद्दल व्यक्त झालो म्हणून जर माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर लाल -पिवळ्या संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषिक, विनाकारण म. ए. समितीचा अपमान केल्याचे शेकडो पुरावे आहेत, त्याचे काय? मला गुन्ह्यांची भीती नाही, कारण आजपर्यंत मी सत्याची, खऱ्याची बाजू मांडत आलो आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या या प्रवृत्तीचा निषेध असून पोलिसांनी नैतिकता दाखवून ‘त्या’ युवतीला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी विनंती आहे, असे बेळगावचे युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले.
युवतीशी असंभ्यवर्तन करणाऱ्या बस वाहकाला मारहाण झाल्या प्रकरणी वक्तव्य केल्याबद्दल म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शेळके बोलत होते. ते म्हणाले की, सदर घटना म्हणजे एक सामाजिक विषय म्हणून मी त्यावर व्यक्त झालो होतो. बस वाहकाचे ते कृत्य पाठीशी घालण्यासारखे आहे का? याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे.
संबंधित युवतीशी गैरवर्तन केल्याबद्दल त्या बस वाहकावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यावर व्यक्त होऊन मी माझे मत मांडल्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे नेमक्या कोणत्या प्रवृत्तीला पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे? हा प्रश्न पडतो. पोलिसांनी थोडी तरी नैतिकता दाखवली पाहिजे. लाल -पिवळ्या संघटना जाणून बुजून सदर घटनेला भाषिकतेचा रंग देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यांना पाठीशी घालण्याचे काम होत आहे. बेळगावमध्ये सदर घटना घडून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत असताना लाल -पिवळ्या संघटनेचा म्होरक्या बेंगलोरमध्ये बसून पोलिसांवर दबाव आणतो आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला जात असेल तर येथील पोलीस लोकशाहीची हत्त्या करत आहेत असे म्हणावे लागेल. लोकशाहीने आम्हाला आमचे मत व्यक्त करण्याचा जो अधिकार दिला आहे तो पोलीस कधीच हिरावून घेऊ शकत नाहीत. पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावेत. आम्हाला तुरुंगात टाकावे, परंतु आमचा आवाज ते दाबू शकणार नाहीत.
संबंधित बस वाहकाला जाब विचारून मारहाण करणारे फक्त मराठी भाषिक नव्हते तर त्यामध्ये संतप्त इतर भाषिक आणि धर्मीय लोकांचाही सहभाग होता. या सर्वांनी ‘त्या’ प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवून त्या बस वाहकाला धडा शिकवला. मारहाणीचे समर्थन आम्ही यापूर्वी केले नाही आणि यापुढेही करणार नाही. मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालणं चुकीचं आहे. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास उच्च न्यायालयाने मध्यंतरी आपल्या एका निकालात कोणत्याही समाज माध्यमांवर मत व्यक्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करून मी पोलिसांना कायद्याने उत्तर देईनच. मात्र खरोखर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी किंवा एखाद्या संघटनेच्या विरोधात मी वक्तव्य केले म्हणून माझ्यावर जर गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर लाल -पिवळ्या संघटना दररोज महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांबद्दल वाटेल ते बरळत असतात. त्यांच्यावर तुम्ही किती गुन्हे दाखल केलेत हे पोलिसांनी स्पष्ट करावे. फक्त समिती आणि मराठी भाषिकच नव्हे तर परवा शिवजयंती दिवशी लाल -पिवळ्या संघटना आणि सोशल मीडियावरील विविध पेजच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत गलिच्छ प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्या.
बाहेरील राज्यातील महापुरुषांना मोठे करू नका असा संदेश देऊन शिवरायांना हिणवल जातं. मुळात छत्रपती शिवाजी महाराज व शहाजी राजांच्या उपकारामुळे आज हे कर्नाटक राज्य अस्तित्वात आहे, याचा त्यांना विसर पडला आहे. एकंदर पोलीस प्रशासन सध्याचे करत आहे ते अत्यंत चुकीचं असून अतिशय किळसवाण्या प्रकाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. कन्नड संघटनांनी सुद्धा थोडी नैतिकता राखून ‘त्या’ युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करावेत. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही अन्यायाविरुद्ध आमच्या हक्कासाठी लढतच राहू, पण पोलीस प्रशासनाने देखील त्या युवतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.
एका युवतीवरील अन्यायाबद्दल व्यक्त झालो म्हणून जर माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर लाल -पिवळ्या संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषिक, विनाकारण म. ए. समितीचा अपमान केल्याचे शेकडो पुरावे आहेत. परवाच्या घटनेत म. ए. समितीचा काहींही संबंध नसताना समितीच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्याबद्दल पोलिसांनी कोणती कारवाई केली? किती जणांना अटक केली? असा आमचा सवाल आहे.
मला गुन्ह्यांची भीती नाही, कारण आजपर्यंत मी सत्याची, खऱ्याची बाजू मांडत आलो आहे त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या या प्रवृत्तीचा निषेध असून पोलिसांनी नैतिकता दाखवून त्या युवतीला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी विनंती आहे, असे शुभम शेळके शेवटी म्हणाले.