बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती तालुक्यातील यल्लम्मा डोंगरावरील श्रीक्षेत्र रेणुका देवी मंदिर बंद असल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरली आहे. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मंदिरात नियमित पूजा-अर्चा सुरू असून, भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध आहे, असे मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून सौंदत्ती तालुक्यातील प्रसिद्ध यल्लम्मा देवी मंदिर बंद असल्याची चुकीची माहिती काही माध्यमांतून आणि समाजमाध्यमांवर पसरवली जात आहे.
याबाबत मंदिर व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देत भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. मंदिरातील सर्व धार्मिक विधी, नित्य पूजा व दर्शन सुरळीत सुरू आहेत. विकासकामे सुरू असली तरी मंदिर बंद ठेवलेले नाही.
भाविक दिवसभर दर्शनासाठी येऊ शकतात. त्यामुळे मंदिर बंद असल्याच्या अफवांना कुणीही बळी पडू नये आणि निश्चिंतपणे देवीच्या दर्शनासाठी यावे, असेही त्यांनी कळविले आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्यात मंदिरात पारंपरिक चुडी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. आता फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पौर्णिमा यात्रेची तयारीही जोरात सुरू असून, लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
समाजमाध्यमांवर मंदिर बंद असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. भाविकांनी अशा खोट्या बातम्या पुढे न पाठवता अधिकृत माहितीसाठी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.