बेळगाव लाईव्ह :बेळगाव व कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सुरक्षा वाढवण्यावर सहमती दर्शवल्यामुळे एका सुरळीत बस ऑपरेशन प्रक्रियेद्वारे उद्या गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी दुपारपासून पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्यासाठी सर्व व्यवस्था आम्ही केली आहे, अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
केएसआरटीसी बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याला भाषिक वादाचा रंग देण्यात आल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही राज्यांमधील बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच समन्वय बैठक पार पडली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन बोलत होते. त्यांनी सांगितले की, दोन्ही राज्यांमधील बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत आम्ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेतली आहे. बससेवा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. दोन्ही पोलीस अधीक्षकांनी आपापल्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे.
त्यामुळे आम्ही कांही तासात एक सुरळीत बस ऑपरेशन प्रक्रिया तयार करणार आहोत. त्यामुळे 27 फेब्रुवारी रोजी दुपारपासून महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने पूर्वीप्रमाणे बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही आवश्यक व्यवस्था केली आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांची याबाबत बातचीत केली आहे. तसेच आमचे कर्नाटकचे डीजीपी महाराष्ट्राच्या डीजीपींशी बोलले आहेत. केवळ बेळगाव आणि कोल्हापूर मध्येच नव्हे, तर सांगली आणि सोलापूर मध्ये जिथे जिथे अप्रिय घटना घडल्या आहेत तिथे योग्य सुरक्षा पुरवली गेली पाहिजे असे सांगून कर्नाटकच्या विविध भागात सुरक्षा पुरवण्याबाबत त्यांनी उच्च स्तरावर चर्चा झाली आहे. मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतील, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली.
बेळगाव आगाराच्या वाहतूक नियंत्रक सुशीला कोटगी म्हणाल्या, कर्नाटक ते महाराष्ट्र बस सेवा सुरू नसल्याने प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. बसेस फक्त दोन्ही राज्यांच्या सीमेपर्यंत जात असून आज बेळगावहून संकेश्वर आणि निपाणीपर्यंत 64 बसेस धावल्या आहेत. प्रवासी महाराष्ट्र सीमेवर उतरून इतर वाहनांनी त्यांच्या इच्छित स्थळी जात आहेत. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक प्रवासी बस सेवा केंव्हा पूर्ववत सुरू होणार अशी विचारणा करत आहेत.
एकंदर महाराष्ट्र कर्नाटक राज्यांमधील बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत गेल्या सोमवारी बेळगाव व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची दोन्ही पोलीस अधीक्षकांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली आहे. त्यामध्ये तपशील ठरवण्यात आला असून उद्या गुरुवार 27 फेब्रुवारीपासून बस सेवा पूर्ववत सुरू होत आहे. त्या अनुषंगाने आजपासून डमी बससेवा सुरू झाली आहे.
दरम्यान, सुळेभावी बसमध्ये वैयक्तिक भांडणाला बसच्या वाहकाने मराठी-कन्नड असा भाषिक रंग दिल्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्राची बससेवा विस्कळीत होऊन त्याचा फटका दोन्ही राज्यांच्या परिवहन महामंडळांना बसला आहे. परिवहन बसेसच्या रोजच्या 1,222 फेऱ्या गेल्या चार दिवसांपासून रद्दच आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात रोज 672 बसफेऱ्या होतात, तर कर्नाटकातून महाराष्ट्रातील बसफेऱ्यांची रोजची संख्या 550 आहे.
बेळगाव आगारातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी रोज 91 बस धावतात. त्याशिवाय धारवाड, बंगळूर, विजापूर, गुलबर्गा, बीदर या सीमेलगतच्या शहरांमधूनही महाराष्ट्रात बस धावतात. बेळगाव आगारातून महाराष्ट्रात धावणाऱ्या 91 पैकी 45 बस चंदगड भागात धावतात. सध्या या सगळ्या बसगाड्या दोन्ही राज्यांच्या सीमेपर्यंत धावत आहेत.