बेळगाव लाईव्ह : वायव्य परिवहनच्या चालक आणि वाहकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रियांका एम. यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पंत बाळेकुंद्री घटनेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
वायव्य परिवहनच्या चालक आणि वाहकांवर प्रवाशांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत 63 हल्ल्यांच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यवस्थापकीय संचालिका प्रियांका एम. यांनी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतन सिंग राठोड यांना निवेदन देऊन केली.
संस्थेच्या कर्मचारी वर्गावर हल्ले होण्याची विविध कारणे समोर आली आहेत. जोरात हॉर्न वाजवणे, सुट्टे पैसे न मिळणे, विशिष्ट ठिकाणी न उतरवणे, लगेज दरासंदर्भातील वाद यामुळे प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात वाद होतात. अनेक वेळा हे वाद गंभीर रूप धारण करून पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचतात. मात्र, पुराव्याअभावी अनेक प्रकरणे “बी” रिपोर्ट म्हणून बंद केली जातात.
नुकतीच पंत बाळेकुंद्री येथे मराठी भाषिक प्रवाशांनी बस वाहकाला मारहाण केली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. विशेष म्हणजे, त्याच वाहकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कन्नड समर्थक संघटनांनी बेळगावमध्ये आंदोलन केले, तर महाराष्ट्रातही वायव्य परिवहनच्या बसेस अडवून त्यांना काळे फासण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, पोलीस विभागाने सर्व बस स्थानकांमध्ये सुरक्षा वाढवावी, चालक-वाहक सुरक्षेसाठी विशेष पथक नेमावे, मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यवस्थापकीय संचालिका प्रियांका एम. यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतन सिंग राठोड आणि बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांना निवेदन सादर केले आहे.