बेळगाव लाईव्ह -मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबविण्यासाठी अभिजात मराठी संस्था, बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवशीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा मंदिर, बेळगाव येथे गुरुवार दि. 27 फेब्रुवारी आणि शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा मेळावा संपन्न होईल.हा एक सांस्कृतिक उत्सव असून यात ग्रंथदिंडी, उद्घाटन, निमंत्रितांचे कवी संमेलन, विद्यार्थ्यांचे कथाकथन आणि कवी संमेलन, विद्यार्थी आणि शिक्षक- पालक मेळावा, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, अभिजात नाट्य संगीताचा कार्यक्रम, मंगळागौरीचे खेळ, खाद्य जत्रा अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक, पत्रकार , भाषातज्ञ, नाटककार डॉ. श्रीपाद जोशी ,नागपुर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर जोशी हे अभिजात मराठीच्या चळवळीतील एक महत्त्वाचे शिलेदार आहेत.त्याचबरोबर पुण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ, बालकुमार साहित्य लेखिका स्वाती राजे याही उपस्थित राहणार आहेत.
त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य केलेले असून ‘इंटरनॅशनल बोर्ड बुक्स फॉर यंग पीपल’ या संस्थेच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत.
या कार्यक्रमात बेळगाव व खानापूर मधील सर्व मराठी संस्था (वाचनालय, सोसायटी, बँका, मराठी शाळा, साहित्यिक मंडळे व सांस्कृतिक संस्था) आणि परिसरातील मराठी शाळा शिक्षक ,पालक आणि विद्यार्थी या सर्वांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे.
या दोन दिवसात भाला, बरची, काठी फिरवणे यांचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार असून व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिकही दाखविले जाईल तसेच विद्यार्थ्यांना समूहगीत शिकविले जाईल.
या संस्थेच्या अध्यक्षस्थानी डॉ. संध्या देशपांडे, उपाध्यक्ष अप्पासाहेब गुरव, कार्याध्यक्ष डॉ .विनोद गायकवाड, उपकार्याध्यक्ष स्वरूपा इनामदार, कार्यवाह अनंत लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर वेंकटेश देशपांडे, जी बी इनामदार हे विश्वस्त असून सहकार्यवाह डॉ. मनीषा नेसरकर, खजिनदार सुहास सांगलीकर हे आहेत.कार्यकारी मंडळात जगदीश कुंटे ,अशोक अलगोंडी, महादेव खोत, सविनय शिवंनगौडर, प्रणव पित्रे व भारती सावंत यांचा समावेश आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.