Tuesday, February 25, 2025

/

महाशिवरात्री महाउत्सव -2025 साठी श्री कपिलेश्वर मंदिर सज्ज

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर यंदा ‘महाशिवरात्री महाउत्सव -2025’ विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा करण्यास सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने आज मंगळवारी मध्यरात्रीपासून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले असून उद्या बुधवारी महाशिवरात्री दिवशी आणि परवा गुरुवारी असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

यासाठी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून महाशिवरात्रीनिमित्त यंदा 30 व्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री कपिलेश्वर मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाचे सचिव अभिजीत चव्हाण यांनी दिली.

बेळगाव लाईव्हशी बोलताना सचिव अभिजीत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त आज मंगळवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून सुरू होणारा पंचामृत अभिषेक उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत चालणार आहेत. यासाठी अभिषेक करू इच्छिणाऱ्या भाविकांना विनंती आहे की पहाटे 3 वाजेपर्यंत ज्यांची नावे नोंद होतील, त्यांचेच अभिषेक 4 वाजेपर्यंत केले जातील.

त्यानंतर उद्या सकाळी 6 वाजल्यापासून रुद्राभिषेक सुरू होतील. महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर मंदिरामध्ये त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी 7 वाजता भव्य अशी पालखी प्रदक्षिणा आणि महाआरती होईल.Shivratri

विशेष म्हणजे बेळगावातील समस्त भाविकांसाठी श्री कपिलेश्वर मंदिराचा प्रसाद म्हणून उद्या बुधवारी 1 लाख 25 हजार 555 लाडवांचे वितरण केले जाणार आहे. तरी भाविकांनी देवदर्शनासह या प्रसादाचा लाभ घ्यावा. महाशिवरात्रीनिमित्त परवा गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाही समस्त शिवभक्तांनी लाभ घ्यावा. तसेच महाशिवरात्री निमित्तच्या विविध कार्यक्रमांचे फेसबुक व युट्युबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण भाविक घरबसल्या श्री कपिलेश्वर मंदिराच्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकणार आहेत, असे अभिजीत चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये कालपासून महाशिवरात्रीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या माळांनी मंदिराची सजावट केली जात आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढल्या असल्याने मंदिर परिसरात मंडप घालण्यात आला असून कार्पेट अंथरण्यात येणार आहे.

नवीन विसर्जन तलाव परिसरात उपवासाच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल भरून देण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी व उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मंदिरात एक्स्ट्रीम व टायगर ग्रुपचे 50 सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच विजया हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक सेवेसाठी सज्ज असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.