बेळगाव लाईव्ह :बस वाहकावरील हल्ल्याचा निषेध आणि त्याच्यावर दाखल केलेला पोस्को खटला मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी उद्या मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटक रक्षण वेदिकेचा (करवे) प्रदेशाध्यक्ष टी.ए. नारायण गौडा याने केली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ निवेदनात नारायण गौडा याने बस वाहकावरील खटला 25 फेब्रुवारीपर्यंत मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा, असा कडक इशारा बेळगावच्या पोलीस प्रशासनाला दिला आहे.
“जर तुम्हाला मराठीवर प्रेम असेल तर महाराष्ट्रात ते व्यक्त करा. कर्नाटकात कन्नड भाषा सर्वोच्च आहे. तुम्ही कन्नड भाषा शिकली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. म्हणूनच मी बाळेकुंद्री आणि इतर ठिकाणी भेट देत आहे. कर्नाटकातील कोणतेही गाव असो, मी तिथे जाईन. बेळगाव जिल्ह्यातील आणि शेजारच्या भागातील आमचे कार्यकर्ते या आंदोलनात सामील होतील,” असे त्याने जाहीर केले आहे.
‘नम्म नडे बेळगावी कडीगे’ अशा शीर्षकाखालील बेळगावातील आंदोलनाचे उद्दिष्ट कन्नड अभिमानाला उजाळा देणे आणि करवेकडून अन्याय्यकारक असल्याचा दावा केलेल्या खटल्याला आव्हान देणे हे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
करवे म्होरक्या नारायण गौडा याच्या उपरोक्त दर्पोक्तीमुळे या प्रदेशातील कन्नड समर्थक आणि मराठी समर्थक गटांमध्ये सुरू असलेल्या तणावात भर पडली आहे. परिणामी बेळगावसह सीमाभागात भाषिक वाद आणखी उग्र रूप धारण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.