बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील मोहिशेत येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पोक्सो कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केलेल्या एका आरोपीची बेळगाव येथील जिल्हा व सत्र पोक्सो विशेष जलदगती न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे.
निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव संदीप नीलकंठ मिरासी (वय 35 वर्षे, रा. मोहिशेत, ता. खानापूर) असे आहे. सदर खटल्यातील फिर्यादी गावाला लागून असलेल्या शेतवाडीत घर बांधून आपल्या कुटुंबासमवेत राहतो. गेल्या 1 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 1 वाजता फिर्यादीची 17 वर्षीय मुलगी घरात एकटीच होती.
त्यावेळी सदरी आरोपी त्यांच्या घरी हातात आवळा घेऊन गेला आणि त्याने त्या मुलीकडे आवळा खाण्यासाठी म्हणून मिठाची मागणी केली. त्यानंतर ती मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्या एकाकीपणाचा फायदा उठवत तू फार सुंदर आहेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
पीडित मुलीने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर तिच्या आईने या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
तसेच संशयीताला अटक करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली होती. याप्रकरणी पोक्सो जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी सरकारतर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. तथापि साक्षीदारातील विसंगतीमुळे संशयीत आरोपी संदीप मिरासी याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.