बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एच 5 एन 1 बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि जिल्हा वन विभाग यांच्या सहकार्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 20 जानेवारी 2024 च्या आकडेवारीनुसार, बेळगाव जिल्ह्यात सुमारे 26.40 लाख कोंबड्या आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील सीमावर्ती तालुके – अथणी, निपाणी, हुक्केरी, बेळगाव, चिक्कोडी आणि खानापूर येथे सात ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
या चेकपोस्टवर 24×7 तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, महाराष्ट्रातून येणाऱ्या कोंबड्या, अंडी, चिकन आणि संबंधित पदार्थांची कसून तपासणी केली जात आहे. नदीकिनारी आणि जलाशय परिसरात स्थलांतरित पक्ष्यांवर देखील विशेष नजर ठेवण्यात येत आहे. कोठेही पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्यास नमुने तपासणीसाठी बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 363 सिरम, 363 क्लोएकल, 363 ट्रेकियल आणि 138 पर्यावरणीय नमुने पशुरोग तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बर्ड फ्लू प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, तांत्रिक सहाय्यक तसेच 15 तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक तालुक्यात ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ कार्यरत करण्यात आली असून, या पथकात पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे.
कुक्कुटपालन व्यावसायिकांना जागरूक करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक औषधे, पीपीई किट्स, जेसीबी मशीन, फॉगिंग मशीन आणि इतर संसर्गनियंत्रण साहित्य उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रादुर्भाव आढळलेला नाही. कोंबडी मांस आणि अंडी सेवन करणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, मात्र 70 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात अन्न शिजवून सेवन करावे. जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.