बेळगाव लाईव्ह : राजधानी दिल्ली येथे आजपासून तीन दिवस चालणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला भव्य ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाला आहे. अभिजात मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या ग्रंथ दिंडीत दिसून आले.
विशेष म्हणजे, या संमेलनात बेळगाव सीमाभागातील मराठी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून सीमाप्रश्नाच्या लढ्याला नवा जोम दिला आहे. दिल्लीकरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या ग्रंथ दिंडीत सीमाभागातील मराठी जनतेचा निर्धार स्पष्टपणे जाणवला.
सकाळी ग्रंथदिंडीची सुरुवात संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून झाली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला.
यावेळी सहज संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे, साहित्यिक कवी शरद गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हरिनामाचा गजर, ढोल-ताशांचा निनाद, संत साहित्यावर आधारित भव्य चित्ररथ आणि पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झालेले साहित्य प्रेमी यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. विशेषतः, “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. संमेलनाच्या या भव्य सोहळ्यात बेळगाव सीमावासियांचा मोठा सहभाग असल्याने सीमाप्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे.
गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभागातील मराठी जनता आपल्या मायमराठी मुलखात सामील होण्यासाठी संघर्ष करत आहे. सीमाप्रश्नाच्या या लढ्यात अनेकांनी बलिदान दिले, अनेकांनी अत्याचार सोसले. आजही कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात सीमाभागातील जनता लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर, साहित्य संमेलनात सीमाभागातील मराठी बांधवांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्रात सामील होण्यासाठी बेळगावातील मराठी माणूस वर्षानुवर्षे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आला आहे. या संमेलनातही “संयुक्त महाराष्ट्रासह, बेळगाव आमच्या हक्काचे!” या बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला. संमेलनाला उपस्थित असलेल्या साहित्यिकांनी आणि मराठी भाषिकांनी बेळगावहून आलेल्या सीमावासियांची व्यथा जाणून घेतली आणि त्यांच्या लढ्याला आपला पाठिंबा दर्शवला.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सीमाभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि बेळगावातील मराठी भाषिकांनी ग्रंथ दिंडीत सहभाग घेत मराठी अस्मितेचा जागर केला. तालकटोरा स्टेडियम येथे पोहोचताच मराठी बांधवांनी एकजुटीचा प्रत्यय देत “संयुक्त महाराष्ट्राच्या” घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सीमाप्रश्नाबाबतचा ठराव संमेलनात मांडला जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. देशाच्या राजधानीत होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाच्या माध्यमातून सीमाभागातील प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडला जात असून बेळगावातील मराठी जनतेचा हा बुलंद आवाज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला ऐकू जावा, या भूमिकेतून समिती शिष्टमंडळ दिल्लीत धडकले आहे.