बेळगाव लाईव्ह ;महाराष्ट्र सरकार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा दावा बोर्डावर घ्यावा. दोन खंडपीठांसमोर जलद गतीने त्याची सुनावणी करून सीमा भागातील मराठी जनतेची कर्नाटकाच्या जोखंडातून मुक्तता करावी, अशी विनंती माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील ऑन रेकॉर्ड वकील ॲड. शिवाजीराव जाधव यांना केली आहे.
माजी जि. पं. सदस्य रामचंद्र चुडामणी मोदगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन ॲड. शिवाजीराव जाधव यांची त्यांच्या चेंबरमध्ये भेट घेऊन त्यांना सादर केले.
मूळ दावा क्र. 000004/2004 नोंद तारीख 21 ऑगस्ट 2004 महाराष्ट्र सरकार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा घातलेला दावा बोर्डावर घेऊन जलद गतीने दोन खंडपीठांसमोर सुनावणी करण्यात यावी.
त्यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पैशाची चिंता करू नका असे आश्वासन दिले आहे. तरी आपण सीमाभागातील मराठी जनतेची कर्नाटकातून मुक्तता करावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी मोदगेकर यांच्या समवेत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी नगरसेवक अनिल पाटील, अण्णासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडू सावंत, वड्डेबैलकर, करंबळकर आदी उपस्थित होते.